शेतकऱ्यांना आधार द्या, नुकसान भरपाई द्या

ॲड.अनिल केसरकरांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: November 01, 2025 13:28 PM
views 38  views

सावंतवाडी : अवकाळी पावसामुळे शेतकरी बागायतदार यांचे प्रचंड नुकसान झाले असून पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्या, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर यांनी केली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या अवेळी पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी बागायतदार यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवादलीत झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत मातीमोल होताना पाहताना गरीब शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत. भात पीक आडवे झाले असून त्यांना कोंब फुटले आहेत. अंगमेहन करून घाम गाळून पिकवलेली शेती निसर्गाच्या या प्रकोपामुळे भुईसपाट झाली असून यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पीक वाया गेलेले आहे. आपला शेतकरी रडत बसत नाही अगर आत्महत्या करण्याचा टोकाचं पाऊल उचलत नाही याचा अर्थ तो आतून खचलाय अस होत नाही. आमच्या शेतकऱ्याला पण मन आहे भावना आहेत. त्याचही अवेळी पडत असलेल्या पावसामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेल आहे. त्यामुळे पडत असलेल्या प्रचंड पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे मोठं आर्थिक नुकसान झालेल आहे व जो मानसिक धक्का बसलेला आहे. त्यातून शेतकरी वर्गाला सावरण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत व केवळ पंचनामे करून न थांबता आपल्या शेतकरी वर्गाला तातडीने आर्थिक नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मनसेतर्फे जिल्हाध्यक्ष ॲड.अनिल केसरकर यांनी केले आहे.