महिला स्वाधार मंचतर्फे उंबर्डेत उद्या 'आत्मक्लेष सत्याग्रह'

महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्याचा करणार निषेध
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 09, 2022 20:20 PM
views 196  views

वैभववाडी : अलीकडे राज्य सरकारमधील जबाबदार नेत्यांकडून महिलांबाबत सातत्याने अपमानास्पद, घृणास्पद व अन्यायकारक अशी विधाने होत आहेत. ह्या सतत होत असलेल्या अर्वाच्च भाषेविरोधात गुरुवारी (१० नोव्हेंबर) उंबर्डेत महिलांचे आत्मक्लेष आंदोलन आहे. महिला स्वाधार मंच उंबर्डे यांच्या पुढाकारातून हे आंदोलन होणार आहे.

    राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अपशब्द वापरले. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी अपमानास्पद शब्द वापरले. राज्यात महिलांबाबत वारंवार अपशब्द वापरून त्यांना अपमानित केले जात आहे. याविरोधात उंबर्डेतील महिला गुरुवारी रस्त्यावर उतरणार आहेत. माजी सभापती शुभांगी उर्फ माई सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली उंबर्डे येथे 'आत्मक्लेष सत्याग्रह' करणार आहेत. महिलांबाबतीत अशी वक्तव्ये करणाऱ्यांना कडक शासन होण्याची मागणी केली जाणार आहे.