'निर्भय बना' हा वर्तमानाचा आवाज : महेश केळुसकर

कविवर्य आ. सो. शेवरे स्मृती काव्यलेखन स्पर्धेचे ठाणे येथे पारितोषिक वितरण
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 13, 2024 14:31 PM
views 59  views

वैभववाडी : वर्तमानातील प्रश्न समजून घेत कवी लेखकांनी निर्भयपणे अभिव्यक्त व्हायला हवे. 'निर्भय बना' हा वर्तमानाचा आवाज आहे व तो असायलाच हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व साहित्यिक डाॅ. महेश केळुसकर यांनी केले.

     ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग-मुंबई आयोजित कविवर्य आ. सो. शेवरे स्मृती चषक राज्यस्तरीय स्वरचित खुल्या काव्यलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. केळुसकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

     डॉ. केळुसकर म्हणाले, 'वर्तमानातील अभिव्यक्त स्वातत्र्यांची होणारी गळचेपी पाहता संविधान हेच आपले खरे देवालय मानून मानवी जीवनातील, वर्तमानातील प्रश्न समजून घेत कवी लेखकांनी निर्भयपणे अभिव्यक्त व्हायला हवे. भयभीत करणाऱ्या व्यवस्थेला न घाबरता लिहिणाऱ्या हातांनी निर्भय बनले पाहिजे, असे त्यांनी कवी लेखकांना आवाहन केले.

    राज्यस्तरीय स्वरचित काव्यलेखन स्पर्धेतील ३४८ कवितांमधून ४ विजयी स्पर्धकांना गौरविण्यात आले. त्यामध्ये अनुक्रमे: अनिल कांबळे(वाशिम), अशोक कांबळे(चंद्रपूर), अनुराधा विभुते(सोलापूर) तर उत्तेजनार्थ साक्षी धवडेकर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथभेट व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष अनिल जाधव, साहित्यिक सुनील हेतकर, कवयित्री कल्पना मलये व मुंबई शाखेचे अध्यक्ष अभय शेवरे उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. सिद्धार्थ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कविसंमेलन झाले. यावेळी कवयित्री योगिनी राऊळ, कल्पना मलये, अभय शेवरे, डॉ. रवींद्र जाधव, डॉ. सुरेखा जाधव, संजय जाधव, किशोर हेतकर, अशोक चाफे, तुषार मांडवकर, चंद्रसेन जाधव व कवी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रतिक पवार, सूत्रसंचालन स्नेहल तांबे यांनी केले. प्रथमेश जाधव यांनी आभार मानले.


 अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा निषेध !

      या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिका आशालता कांबळे प्रमुख मार्गदर्शक होत्या. 'चळवळीसाठी काम करणे हाच आमचा एकमेव धर्म, याशिवाय आमचा कोणताही धर्म नाही, असे वक्तव्य करून कवितेला आता कणखर भूमिका असायला हवी', अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकारांवरील हल्ले, सातत्याने होणारी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, संविधान विरोधी वृत्ती या साऱ्या मनसुब्यांवर पारितोषिक वितरण सभारंभात चर्चा होऊन या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.