हत्तीरोग प्रकरणी महेश कांदळगावकरांच प्रशासनावर टीकास्त्र

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 24, 2024 14:25 PM
views 130  views

मालवण : मालवणत हत्ती रोगाचा रुग्ण पुन्हा सापडणे याला प्रशासकाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. मागील दोन वर्ष आपण सातत्याने पाठपुरावा करूनही स्वच्छता, डास फवारणी कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले. फक्त स्वच्छता मोहिमेचे कार्यक्रम हे फक्त ईव्हेंट पुरते होते यावर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे अशी टीका माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 2005 च्या  दरम्यान  मालवण शहरात जवळपास 90 हत्ती  रोगाचे रुग्ण सापडून आले होते. त्यावेळी मालवण नगरपरिषद,  आरोग्य विभाग यांनी दिवस रात्र  मेहनत करून जवळपास एका  वर्षाच्या कालावधीमध्ये ही रुग्ण संख्या आटोक्यात आणली होती.  मालवण नगरपरिषद सातत्याने डास फवारणी करणे,  धूर फवारणी, सेफ्टिक टाक्याच्या व्हेंट पाइपना जाळ्या बसविणे, सार्वजनिक सेप्टिक टँकच्या टाक्या सक्शन गाड्या लावून उपसून घेणे इत्यादी उपाय योजना करत असल्याने २०१४ पर्यंत रुग्ण संख्या झीरो पर्यंत आणण्यात यशस्वी झाली.  त्यानंतर २०२१ पर्यंत या डास प्रतिबंधक उपाय योजना केल्या जात होत्या.  पण आमचा लोकप्रतिनिधीचा कालावधी २०२१ ला संपल्यानंतर प्रशासकीय कालखंडात या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले.  आणि त्याचा परिणाम म्हणून २०१४ पासून आटोक्यात आणलेल्या हत्ती रोगाचा फैलाव या मागील अडीच वर्षाच्या प्रशासकाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा रुग्ण सापडल्याने फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील दोन वर्ष सातत्याने डास फवारणी,  स्वच्छता करणे बाबत सूचना करूनही ही बाब गांभीर्याने न घेतल्याने ही परिस्तिथी निर्माण झाली.  

आमच्या कालावधीत पूर्णतः साफ केलेल्या डपिंग ग्राऊंडवर आज पुन्हा कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. खताच्या मशिन, गांडूळ खतासाठी बांधलेली पिठ या मागील अडीज वर्षापासून बंद आहेत त्या सुरू करण्याबाबत सातत्याने सुचित करूनही आजमिती पर्यंत सुरु करण्यात आलेल्या नाहीत.  फोवकांडा पिंपळ येथील कारंजा दीड वर्ष बंद आहे आणि त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासाच्या अळ्या पडल्या आहेत याचे फोटो पण प्रसिद्ध केले होते त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. स्वच्छता करा,  फवारणी करा याबाबत लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे पदाधिकारी याना निवेदन द्यावी लागतात ही खरी शोकांतिका आहे.  ही सगळी काम करण्यासाठीच तर शासनाने पगारी कर्मचारी नियुक्त केलेले असतात. पण कर्मचारी यांच्या या अश्या मनमानी कारभारामुळे त्याचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागतात.               

वास्तविक पाहता नगरपालिका निवडणूक होई पर्यंत प्रशासकीय कारभार हा  प्रांत दर्जाच्या  अधिकाऱ्याकडे दिला जायचा त्यामुळे मुख्य अधिकारी याच्या कामावर त्यांचा वचक असायचा. परंतु मालवण नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी आहेत त्यांच्याकडेच प्रशासकाचा कार्यभार दिल्याने एकाच व्यक्तीकडे दोन्ही पदे असल्याने बिना अंकुश काम सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे.   आम्ही सातत्याने म्हणत होतो की मालवण नगर परिषदमधे प्रशासकाची स्वच्छतेची मोहीम फक्त  फोटो आणि ईव्हेंट पुरती मर्यादित आहे , त्यात कुठलेही सातत्य राखले जात नाही यावर हा हत्ती रोगाचा रुग्ण सापडल्याने शिक्का मोर्तब झाले आहे.  अशी टीका माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे.