तळकोकणात महायुतीला सुरूंग...!

मंत्री केसरकरांविरूद्ध भाजपने थोपटले दंड ? | महायुतीचा नेत्यांची डोकेदुखी वाढली !
Edited by: विनायक गांवस
Published on: October 14, 2024 09:29 AM
views 555  views

सावंतवाडी : महायुती भक्कम आहे अस विधान नेते करताना तळकोकणात महायुतीला सुरूंग लागला आहे. भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. पक्षाने कारवाई केली तरी मी दीपक केसरकर यांचा प्रचार करणार नाही. माझा निर्णय झाला आहे. पहिल प्राधान्य पक्षाला राहील. तुम्हाला पक्ष सोडा असं सांगाणार नाही. केसरकरांकडून पैशाचं वाटप होईल. ते पैसे घ्या ! पण, आपलं ठरलंय हे लक्षात ठेवा असं आवाहन श्री. तेलींनी केल आहे. भाजप कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. 

सावंतवाडी येथे माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्ता बैठकीच आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना तेली म्हणाले, पक्षाने कारवाई केली तरी मी दीपक केसरकर यांचा प्रचार करणार नाही. निवडणूक आली की पैसे पेरायचे, खोटी आश्वासने द्यायची हे काम दीपक केसरकर यांनी केलं. पंधरा वर्षात किती आमसभा घेतल्या ? असा सवाल केला. जोपर्यंत आमदार बदलत नाही तोपर्यंत सावंतवाडीचा विकास होणार नाही. कार्यकर्त्यांवर कसा अन्याय होतो ते वरच्या लोकांना देखील समजलं पाहिजे. केसरकरांकडून पैशाच वाटप होणार आहे. त्यामुळे पैसे घ्या, लक्ष्मीचा स्वीकार करा. पण, आमचं ठरवलंय हे ध्यानात ठेवा अस आवाहन श्री. तेली यांनी केल.आयुष्यभर मी संघर्ष केला. मी तुम्हाला सांगणार नाही पार्टी सोडा. माझा निर्णय झाला आहे. पहिल प्राधान्य माझ्या पक्षाला राहिलं. जीव ओतून पक्षासाठी काम केलं आहे. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. २०१४ ला देखील काही झालं नाही. जिल्हा बँकेत मला कोणी फसवल माहीत आहे. लोकसभेत मॅन ऑफ द मॅच केसरकर म्हंटल गेलं. पण, मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली असं मत तेली यांनी व्यक्त केले. 

यावेळी उपस्थित भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजन तेली यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. सावंतवाडी मतदारसंघात पक्ष संघटना वाढवणारा आमदार असावा, भाजपला हा मतदारसंघ मिळाला असं मत व्यक्त केलं. तर दीपक केसरकर यांना उमेदवारी दिली तर काम करणार नाही असा इशाराही उपस्थित भाजच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी माजी आमदार राजन तेली, भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, एकनाथ नाडकर्णी, रविंद्र मडगावकर, आनंद नेवगी, रूपाली शिरसाट, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दंड थोपटल्यान महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे जाहीर दिसून आलं.

स्थानिक भाजप नेते अनुपस्थित !

राजन तेली यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीला भाजपचे स्थानिक नेते उपस्थित नव्हते. युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा संघटक महेश सारंग, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, युवा नेते संदीप गावडे या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने दिसून आली.