महावितरणचे कुडाळ मुख्यालयच बेपत्ता ? नितीन वाळके काय म्हणतायत ?

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 12, 2024 14:25 PM
views 371  views

मालवण : महावितरणच्या अनागोंदी कारभाराबाबत जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने जिल्हा व्यापारी महासंघाने महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना बजावलेली जाहीर नोटीस न स्वीकारल्याने ती माघारी आली आहे. यावरून अधीक्षक अभियंता गैरहजर आहेत किंवा महावितरणचे कुडाळ मुख्यालयच बेपत्ता झाले असा होत आहे. असे स्पष्ट करत आता ही नोटीस प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयाला बजावण्याचा निर्णय वीज ग्राहक संघटनेने घेतला आहे अशी माहिती व्यापारी महासंघाचे नितीन वाळके यांनी दिली.

 दरम्यान येत्या शुक्रवारी जिल्ह्यातील चार लाख वीज ग्राहकांच्या वतीने जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ महावितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास फाटक यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या गोंधळी व बेजबाबदार कारभाराचा पंचनामा सध्या जवळपास संपुर्ण जिल्ह्यात सुरू आहे. याबाबत सातत्याने सर्वच प्रसार माध्यमातून रोज विविध ठिकाणाहून वीज ग्राहकांनी आवाज उठवल्याच्या बातम्यांचा ओघ थांबतच नाही आहे. जिल्हा वीज ग्राहक संघटनेने महावितरणच्या बेजबाबदार कारभारा विरोधात आवाज उठवल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनीही या जनआक्रोशाची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहेच. याबाबत वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांच्यावर २४ मे रोजी जाहीर नोटीस कंपनीच्या अधिकृत वाॅटसअप व इमेलद्वारे बजावली होती. याच नोटीसीची छापील प्रत अधिक्षक अभियंता या अधिकारात विनोद पाटील यांना रजिस्टर एडी करून पोष्टाने कंपनीच्या कुडाळ एमआयडीसी येथील अधिकृत पत्त्यावर २८ मे रोजी बजावणीसाठी पाठवली होती. त्याप्रमाणे टपाल कार्यालयाने ही नोटीस नमुद पत्त्यावर २९ व ३० मे असे दोन दिवस बजावण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिक्षक अभियंता गैरहजर असा शेरा मारून हे दोन्ही दिवस ही नोटीस कार्यालयाकडून परत पाठविण्यात आली असल्याचे टपाल खात्याच्या शेऱ्यावरून दिसून येत आहे. टपाल खात्याच्या नियमानुसार एक आठवडा वाट पाहून संबंधित नोटीस स्विकारण्यास महावितरण कंपनीकडून कोणीही व्यक्ती न आल्याने अनक्लेम्ड अशा शेऱ्यासह ही नोटीस महासंघा कडे १० जून रोजी परत पाठवली आहे.

     याचाच अर्थ असा की एकतर अधिक्षक अभियंता आपला पदभार हस्तांतरीत न करता २९ मे पासून ९ जूनपर्यंत आपल्या कामावर गैरहजर आहेत किंवा महावितरणचे कुडाळ मुख्यालयच बेपत्ता झाले आहे, असा होतो. महासंघाने बजावलेली नोटीस सिंधुदुर्ग महावितरणच्या अधिक्षक अभियंत्याना न पोहोचल्याने आता हीच नोटीस महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयावर बजावणीसाठी पाठवण्याचा निर्णय वीज ग्राहक संघटनेने घेतला आहे. याचबरोबर येत्या शुक्रवारी जिल्ह्यातील सुमारे चार लाख वीज ग्राहकांच्या वतीने जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ  महावितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची भेट घेणार आहेत. त्यांनाही महावितरण सिंधुदुर्गचे कार्यालय बेपत्ता झाल्याबाबत अवगत करण्यात येणार असल्याचेही श्री. वाळके यांनी सांगितले.