प्राथमिक अहवाल चौकशीत महावितरण - ठेकेदाराचा हलगर्जीपणा : सचिन कुंभार

Edited by:
Published on: September 04, 2023 16:21 PM
views 167  views

कुडाळ : वीज नियंत्रक यांच्याकडूनही धनंजय फाले मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून त्या बाबतचा अहवाल प्राप्त होताच आणि त्यात अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच महावितरणने नेमलेल्या ठेकेदाराकडून मृत धनंजय फाले यांच्या विम्याचे कागद पूर्तता सुरू आहे. मृत धनंजय फाले यांच्या वारसांना सात ते आठ महिन्यांमध्ये विमा कंपनी द्वारे मदत केली जाईल अशी प्रतिक्रिया महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली आहे. मात्र उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत  तोपर्यंत आम्ही कार्यालयासमोरून उठणार नाही अशी भूमिका उपोषण करते अभय शिरसाठ यांनी घेतली आहे.

आंदोलन स्थळी विद्युत निरीक्षक  कुंभार दाखल झाले असता प्राथमिक चौकशी अहवालात महावितरण व ठेकेदार यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र अंतिम चौकशी अहवाल दोन ते तीन दिवसात सादर करू अशी माहिती  उपोषणकर्त्यांना दिली आहे. उपोषणकर्ते आक्रमक झाले आहेत. तर आम्हाला आमच्या तीनही मागण्या सहा महिन्यात पूर्ण करा व तसे लेखी द्या अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली आहे. उपोषण स्थळी शिवसेना नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत दाखल झाले आहेत.

महावितरण कंपनी कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले अपघात प्रकरणी कोणतीही मदत मिळाली नसल्याने आज सकाळी १० वाजल्यापासून महावितरण जिल्हा कार्यालय कुडाळ येथे नागरिकांनी आमरण उपोषण छेडण्यात आले आहे. 

२१ जुलै २०२३ रोजी कुडाळ येथे महावितरण कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले हे ११ केव्ही लाईनवर काम करीत असताना ते  गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान फाले यांचे गोवा येथे निधन झाले होते. त्यानंतर धनंजय फाले यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत मिळावी आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागण्या करण्यात आल्या. परंतु, या घटनेला एक महिना होऊन गेला असताना फाले कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमी आज सकाळी कुडाळ विकास समिती, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, महादेवाचे के ग्रामस्थ, पिंगुळी शेटकरवाडी, गुढीपूर ग्रामस्थ आणि कुडाळ तालुका धनगर समाज यांनी आमरण उपोषण छेडले आहे. यावेळी उपोषणकर्त्यानी महावितरण अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.