LIVE UPDATES

पेपरफुटीच्या संशयाने महाटीईटीला ब्रेक

सिंधुदुर्गातील 4 हजार112 उमेदवारांचा खोळंबा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 27, 2026 15:27 PM
views 20  views

सिंधुदुर्गनगरी :  रविवारी (२८ जून) कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. भिवंडी येथे प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संशयावरून पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी सज्ज असलेल्या ४,११२ उमेदवारांसह राज्यातील सुमारे ६ लाख उमेदवारांचा खोळंबा झाला आहे.

जिल्ह्यात परीक्षेसाठी ११ केंद्रांवर सर्व तयारी पूर्ण झाली होती. प्रत्येक परीक्षा कक्षात सीसीटीव्ही, उमेदवारांचे फिंगरप्रिंट व फेस स्कॅनिंग, मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, बायोमेट्रिक पडताळणी तसेच कडक पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली होती. ३ झोनल अधिकारी, ११ केंद्रसंचालक, ११ सहाय्यक पर्यवेक्षक आणि १८५ समवेक्षकांची नियुक्तीही करण्यात आली होती.

मात्र, शनिवारी पहाटे भिवंडी येथे काही व्यक्तींकडे शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी धाड टाकून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली असता संबंधितांकडे असलेले काही प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे प्राथमिक तपासात आढळले. याप्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण पारदर्शकपणे व्हावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या उद्देशाने २८ जून रोजी होणारी महाटीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेपर-१ साठी १,९०३ आणि पेपर-२ साठी २,२०९ असे एकूण ४,११२ उमेदवार परीक्षा देणार होते. परीक्षेची नवीन तारीख व इतर सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.