
सावंतवाडी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सावंतवाडी तालुक्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मतदार यादी संपूर्णपणे स्वच्छ आणि अचूक करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून ३० जून ते २९ जुलैपर्यंत बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करणार आहेत. याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी बीएलओ, राजकीय पक्षांचे बीएलए, लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले. येथील बॅ. नाथ पै सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम, 2026 च्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती यावेळी तहसीलदार श्री. पाटील यांनी दिली. यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बी.एल.अे.), बीएलओ आदी उपस्थित होते. २९ जुलैपर्यंत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी होणार असून त्यानंतर मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण, ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दावे व हरकतींसह ३ ऑक्टोबर २०२६ पूर्वी त्या निकाली काढण्यात येणार आहेत. तर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार श्री. पाटील यांनी दिली. आज याबाबतचा कार्यक्रम नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात पार पडला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.










