गोव्यात १२ मार्च रोजी १०८ यज्ञ कुंडाचा 'महाशिवयाग' !

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे राहणार उपस्थित
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 05, 2023 16:35 PM
views 292  views

सिंधुदुर्ग : श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास, माड्याचीवाडी, श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवा न्यास, बेती पणजी संस्थापक, अखिल भारतीय महात्यागी साधू समाज आखाडा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री श्री 108 महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या उपस्थित १०८ यज्ञ कुंडाचा 'महाशिवयाग' एक अनंत फलदायी यज्ञ रविवारी १२ मार्च २०२३ रोजी वाळकेश्वरवाडा, बेती,बार्देश गोवा येथे पार पडणार आहे.

श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवा न्यास यांच्या माध्यमातून या महाशिवयागाच आयोजन करण्यात आल आहे. या महाशिवयागास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, पेन्ह दी फ्रान्स पंचायत सरपंच स्वप्नील चोडणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 12.30 प्रमुख यज्ञयाग, दुपारी 12.30 ते 1 मुख्यमंत्री स्वागत समारंभ, दुपारी 01.30 वा. सद्गुरूंचे मार्गदर्शन, दुपारी 2 वा. महाप्रसाद व 3 वाजल्यापासून अखंड जपसेवा केली जाणार आहे.

गोव्याच्या निसर्गरम्य देवभूमीत पर्यावरण, अध्यात्म, विज्ञान, संगीत, संस्कृती, श्रद्धा, भक्ती आणि कर्म यांचा सुरेख संगम असणाऱ्या 108 यज्ञ कुंडांचा महाशिवयागा दरम्यान आपले दुःख, दारिद्रय, अरिष्ट दूर करण्यासाठी या महायागात आपण सहभागी होवून आपली पुढची वाटचाल समृद्धीकडे नेण्यास सज्ज व्हा. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हा अस आवाहन श्री स्वामी समर्थ श्रद्धा भक्त सेवा न्यास यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.