
सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारचा क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यभरात महा-साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी आणि तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पूर्णपणे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. महा-साधना सप्ताह कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना ‘TECH-वारी 2.0’ मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने साधना सप्ताह राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्यभरात दिनांक २ ते ८ एप्रिल या कालावधीत महा-साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना ७ दिवसांत किमान ४ तासांचे अभ्यासक्रम 'iGOT कर्मयोगी भारत' पोर्टलवर लॉग इन करुन पूर्ण करावे लागणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महासाधना सप्ताहात सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे श्रीमती धोडमिसे यांनी नमूद केले.
यामध्ये शासनाच्या विविध विभागांतील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या कामाशी संबंधित नवीन कौशल्ये, तंत्रज्ञान आणि कार्यालयीन कामकाज सुकर होण्याच्या पद्धती माहिती करुन घेता येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व विभागांना त्यादृष्टीने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागांतील अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग यामध्ये असणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.
महा-साधना सप्ताहात अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे काम सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करणार असल्याने कामकाजावर परिणाम न होता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कौशल्यवृद्धी होण्यास मदत होणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे ३ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यास 'एआय दक्ष' बॅज आणि मार्केटप्लेस वरील विस्तारित अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यास 'कर्मयोगी उत्कर्ष' बॅज देण्यात येणार आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुरस्कृत करण्यात येणार आहे. शासकीय कामकाजाची गती आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.












