महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by:
Published on: March 15, 2025 12:26 PM
views 151  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी आमदार गाणार सर, माजी आमदार भगवानराव साळुंखे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर १६ मार्चपासून येत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे,मुंबई जिल्ह्याचे पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्याध्यक्ष माजी आमदार ना. गो. गाणार  हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून १६ मार्च २०२५ रविवारी सकाळी ठीक अकरा वाजता न्यू इंग्लिश स्कूल ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे, प्रभारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या संदर्भात या सर्व कर्मचाऱ्यांबरोबर सहविचार सभेचे आयोजन केलेले आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभारी मुख्याध्यापक आणि त्यांच्या समस्या शाळा तिथे मुख्याध्यापक असणेआवश्यक आहे. शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणावर इथे विचार विनिमय होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्यासह शिक्षण विभागाच्या  मनमानी कारभाराविरोधात १७ मार्चला शिक्षक परिषद आंदोलन छेडणार असल्याच सांगण्यात आलं.

याशिवाय १६ मार्चला रविवारी  महाराष्ट्र राज्यातील प्रभारी  मुख्याध्यापकावर शासनाकडून होत असलेल्या अन्यायविरोधात वेणूनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक परिषद आंदोलन छेडणार असून, सत्ताधारी पक्षाचे लक्ष वेधणार आहेत. 

महाराष्ट्राचे शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू हे दोन-तीन महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षक परिषदेच्या प्रलंबित कामाची यादी दिली होती. तसेच जी कामे प्रलंबित आहेत, ती तात्काळ पूर्ण करण्यास सांगितले होते. जर ही कामे झाले नाहीत तर आपण जेव्हा सिंधुदुर्गात येणार तेव्हा त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.  

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी २२ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी येथील रेस्ट हाऊसवर शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक तक्रारीचे पाढे वाचले होते. तसेच जी प्रलंबित कामे आहेत, ती तात्काळ पूर्ण  करण्याचे आदेश दिले होते. मात्र, यातील कोणतीही कामे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी अद्यापही केलेली  नसल्याच बोलल जातंय. 

याशिवाय ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीपीडीसीच्या बैठकीत माध्यमिक शिक्षण विभागाच्या  भोंगळ कारभाराविरोधात कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांना शिक्षक परिषदेने निवेदन दिले होते. या निवेदनाची चर्चा आमदार निरंजन डावखरे यांनी सभागृहात करत ही तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली होती. आमदार निरंजन डावखरे यांनी ही सुचवलेली कामे तसेच अपूर्ण फाईल पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. 

शिक्षक परिषदेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या अनेक फाईल माध्यमिक शिक्षणा विभागाकडे पडून असून त्यावर कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचं आरोप होत आहे.  या सर्व बाबीवर आक्रमक भूमिका घेत वेणूनाथ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आंदोलन छेडणार आहे. 

शिक्षकांच्या हक्कावर गदा येत असेल तर त्याचा विरोध शिक्षक परिषदेच्या वतीने होणार आहे. जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतरांचे प्रलंबित प्रश्न, निवड आणी वरिष्ठ वेतनश्रेणी,मेडिकल बिले, फरकाची बिले यासंदर्भात ज्या शिक्षकांच्या समस्या असतील त्यांनी लेखी स्वरुपात जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यवाह शिक्षक परिषद यांच्याकडे द्याव्यात. यामुळे हे प्रश्न सोमवार दिनांक १७ मार्चला सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या समवेत बैठकीत शिक्षक परिषदेच्या वतीने मांडण्यात येणार असल्याच सांगण्यात आलं.

वेणूनाथ कडू यांच्या ह्या दौऱ्यात आणि आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, सचिव नंदन घोगळे आणि कोकण विभाग कार्याध्यक्ष सलीम तकिलदार यांनी केले आहे.