
वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही नेहमीच शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून ओळखली जाते. शिक्षकांच्या विविध प्रश्न सोडवण्यात नेहमी अग्रेसर असणारी संघटना विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच शैक्षणिक कार्य करत विविध उपक्रम राबवत असते. शिक्षक समिती शाखा वेंगुर्ला मार्फत दत्तक पालक उपक्रम राबवला जातो.शिक्षक समिती शिलेदारांमार्फत दरवर्षी वेंगुर्ला केंद्रातील १४ केंद्रामधून ४२ विद्यार्थी दत्तक घेतले जातात. यंदाचे उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.
६ जुलै रोजी साई मंगल डिलक्स हॉल वेंगुर्ला येथे हा सोहळा संपन्न झाला. दत्तक पालक उपक्रमा सोबतच नव्याने रुजू झालेल्या शिक्षक बंधू भगिनींचे वेंगुर्ला तालुका शाखेमार्फत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद तालुकाध्यक्ष सिताराम नाईक यांनी भूषवले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सचिव तुषार आरोसकर, राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर , सचिन मदने, कोकण विभाग सचिव संतोष परब, कोकण विभाग संघटक प्रशांत मडगावकर, जिल्हा शिक्षक नेत्या सुरेखा कदम, सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक, वेंगुर्ला संचालक सिताराम लांबर, कुडाळ तालुकाध्यक्ष शशांक आटक, सचिव महेश गावडे, मालवण तालुकाध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड , सचिव नवनाथ भोळे, माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संपूर्ण तालुका कार्यकारिणीने मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. शिक्षक समिती ही शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून शिक्षकांच्या हक्कासोबत विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविणारी अग्रगण्य संघटना आहे असे प्रतिपादन यावेळी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले. अशाचप्रकारे आणखी उपक्रम ह्या तालुक्यात व्हावेत , विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मनाला समाधान वाटले असे मनोगत गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. चंद्रकांत अणावकर यांनी संघटनेचा इतिहास आणि सद्य स्थिती आपल्या भाषणातून सांगितली. यावेळी ४२ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच नव्याने तालुक्यात रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत तालुका शाखेमार्फत करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिताराम लांबर, सूत्र संचालन रामा पोळजी, तर आभार प्रदर्शन त्रिंबक आजगावकर यांनी केले. यावेळी बहुसंख्येने शिक्षक समिती सभासद, नवनियुक्त शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.