
वैभववाडी : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या सिंधुदुर्गातील कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.११)होणार आहे. तसेच जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक सिंधुदुर्गात होणार असल्याची माहीती संचालक प्रमोद रावराणे यांनी येथे दिली. येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे सचिव सिध्देश रावराणे उपस्थित होते.
ते म्हणाले मार्केटिंग फेडरेशनचे कार्यालय एक खाजगी इमारतीत सुरू होते. यासंदर्भात आपण तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे कार्यालयाकरीता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १७०० स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून दिली. त्याकरीता विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील पाठपुरावा करून हे कार्यालय पुर्ण सोयीनिशी उपलब्ध करून दिले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन ११ एप्रिलला होत असुन त्याकरीता मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, मंत्री संजय सावकारे,खासदार नारायण राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्हयातील सर्व आमदार आणि फेडरेशनचे राज्यभरातील सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्रातील फेडरेशनच्या या नव्या कार्यालयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनासोबतच फेडरेशनची सभा जिल्हयात होणार आहे.जिल्ह्याच्या इतिहासासातील ही पहिलीच सभा ठरणार आहे. या सभेनंतर सिंधुदुर्गातील विविध सहकार संस्थांना फेडरेशनचे पदाधिकारी भेट देणार आहेत.
सिंधुदुर्गात होत असलेली बैठक,कार्यालयाचे स्थंलातर सोहळ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्गातील विविध शेतीच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या कार्यालयाच्या स्थंलातर सोहळ्यास सर्व शेतकरी,सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मंडळीनी उपस्थित राहावे असे आवाहन फेडरेशनचे कोकण विभागाचे संचालक प्रमोद रावराणे यांनी केले आहे.