महाराष्ट्र दुभंगला जातोय ; 'राज-उद्वव' एकत्र या : ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: July 07, 2023 14:36 PM
views 194  views

सावंतवाडी : महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती लांच्छनास्पद आहे. महाराष्ट्र तोडण्याचा दिल्लीश्वराचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र कुणासमोर कधी झुकला नाही, वाकला नाही अन् झुकणारही नाही. पण, सध्या महाराष्ट्र दुभंगला जात आहे. देशातील प्रादेशिक पक्ष फोडण्याचं काम दिल्लीश्वर करत आहेत. त्याला शह देण्यासाठी महाराष्ट्राला अन देशाला दिशा देण्यासाठी महाराष्ट्राचे दोन सैनिक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र याव अस आवाहन ज्येष्ठ शिवसैनिक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केले आहे.


महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्रासाठी हे लांच्छनास्पद आहे. प्रत्येक मतदारानं पक्ष, कार्यकर्ता बघून मतदान केले होत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्यावेळी १०७ हुतात्मे गेले तेव्हा महाराष्ट्राला मुंबई मिळाली. लढवय्यांचा हा महाराष्ट्र आहे. दिल्लीश्वरासमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही, वाकला नाही अन् झुकणारही नाही. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. त्याचा मी एक साक्षीदार आहे. त्याग, समर्पणातून शिवसेना उभी राहिली आहे. मध्यंतरी भावकीत भांडण होऊन राज-उद्धव विभक्त झाले. राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली. तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सांभाळला.

सध्या महाराष्ट्रात राजकारण आणि खुर्चीसाठी शिवसेना, राष्ट्रवादीत फुट पाडण्याच काम केलं गेलं आहे. महाराष्ट्र दुभंगला जात आहे. देशातील प्रादेशिक पक्ष फोडण्याच काम दिल्लीश्वर करत आहेत. त्याला शह देण्यासाठी महाराष्ट्राला अन देशाला वाचवण्यासाठी महाराष्ट्राचे दोन सैनिक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. मराठी माणसांसाठी या दोन भावांनी एकत्र येत नवी दिशा देत या मतलबी राजकारणाला जागा दाखवावी.

महाराष्ट्र तोडण्याच काम करणाऱ्यांना रोखत त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसेनेचा पाया असलेल्या कोकणातून राज-उद्धव यांना आवाहन करतो की हेवेदावे बाजुला ठेवून एकत्र या, छत्रपती शिवाजी महाराजांच हिंदवी स्वराज्य, भगवी पताका डौलाने फडकविण्यासाठी हातात हात घालून एकत्र या, दिल्लीश्वराला त्यांची जागा दाखवून द्या असं आवाहन कोकणातील शिवसेनेचे सुरुवातीचे जिल्हाप्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केले आहे.