समाजकंटकाने पाडलेला 'तो' टॉवर महापारेषणने पुन्हा उभारला

महापारेषणची कार्यतत्परता | गैरसोय दूर करत वीजपुरवठा पूर्ववत सुरू
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 29, 2024 11:00 AM
views 261  views

कणकवली : राधानगरीहून सिंधुदुर्गला विद्युत पुरवठा करणाऱ्या ११० केव्ही लाईनचा २५ मीटर उंचीचा टॉवर (मनोरा) २६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने गॅसकटरने कापून खाली पाडला. या कृत्यामुळे महापारेषण, महावितरणसह सर्व यंत्रणाही चक्रावून गेली असून याबाबत महापारेषणकडून पोलिसांत अज्ञाताविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. चालू स्थितीतील हा टॉवर खालून जाणाऱ्या ११ केव्ही लाईनवर पडल्याने शिवडाव परिसरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता .महापारेषणने रात्रंदिवस काम करून रुपेश गायकवाड कार्यकारी अभियंता महापारेशन यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत सदरचा टॉवर पुन्हा उभा करत  विदयुत ग्राहकांची गैरसोय दूर करत वीजपुरवठा पूर्ववत सुरू करून कार्यक्षमता दाखवली आहे.

समाजकंटकाने वीज टॉवर गॅसकटरने कापून खाली पाडला याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अधिकारी संजय कळविकट्टे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार,  २६ जानेवारी रोजी मध्यरात्री २.१० वा. च्या सुमारास राधानगरीहूनहून कणकवली येथे वीजपुरवठा करणाऱ्या ११० केव्ही लाईनच्या मनोऱ्याचा पाया अज्ञात व्यक्तीने गॅस कटरच्या सहाय्याने कापून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता दस्तऐवज अधिनियम १९८४ च्या कलम ३ व भादंवि कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

२५ जानेवारी रोजी उत्तररात्रीनंतर व २६ रोजी पहाटेंच्या पूर्वी हा प्रकार घडला असावा. यातील अज्ञात हा माहीतगार असण्याची शक्यता आहे. कारण रस्त्यापासून जवळ असलेला टॉवर कापण्यात आला आहे. टॉवरपर्यंत गॅसकटर व आवश्यक साहित्याचे वाहन नेऊन नंतरच हा टॉवर कापण्यात आला आहे. तसेच टॉवर कापताना एका बाजूचे खांब अगोदर कापून एका बाजूने भार आल्यानंतर दुसरे खांब कापण्यात आल्याने तो एका बाजूला पडल्याचे दिसून येत होते.

 अज्ञाताकडून करण्यात आलेले हे कृत्य अत्यंत धोकादायक होते. तसेच यातील अज्ञाता बरोबर आणखी काही जण असण्याची शक्यता आहे.  हा  टॉवर पडताना लाईन तुटली असती अथवा काही दुर्घटना घडली असती तर ते धोकादायक ठरले असते. मात्र, टॉवर कापताना अत्यंत सावधगिरी बाळगत हे दुष्कृत्य करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अशाप्रकारे चालू ११० केव्ही लाईनचा टॉवर कापण्याचा नेमका उद्देश काय? हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. तसेच टॉवर कापल्यानंतर त्यातील कोणत्याही साहित्याला हात लावण्यात आलेला नाही.  याकामी रुपेश गायकवाड कार्यकारी अभियंता महापारेशन तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमधील अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय कळविकट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी,कर्मचाऱ्यांनी  अहोरात्र काम करून 110 kv चा टॉवर पुन्हा उभा करून विद्युत पुरवठा पूर्ववत चालू केला.याकामी त्यांना  प्रांजल कांबळे,महापारेषन अधीक्षक अभियंता व सौ. शिल्पा कुंभार महापारेषन मुख्य अभियंता यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.महापारेषांच्या या कार्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.