
सावंतवाडी : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष व शिक्षक नेते श्री. म ल देसाई यांच्या उत्तुंग शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून आज महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर निवड केलेली आहे. ही निवड पुढील ३ वर्षांसाठी असेल. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रातील नामवंत अशा २४ व्यक्तिची निवड पुढील ३ वर्षांसाठी किंवा महाराष्ट्र शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत केली जाते. आज या मंडळाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यामध्ये निवड झालेले श्री. म ल देसाई हे पहिलेच प्राथमिक शिक्षक आहेत.
श्री. म. ल. देसाई सर हे प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख अशा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ ३५ वर्षाच्या आदर्शवत सेवेतून नुकतेच निवृत्त झालेले आहेत. ते दोडामार्ग तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र आहेत. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षक व विद्यार्थी यांच्या अनेक समस्या, शैक्षणिक प्रश्न राज्य व केंद्र सरकारपर्यंत आग्रहाने मांडून सोडविल्या आहेत. देशपातळीवर द्वैवार्षिक अधिवेशनावेळी सिंधुदुर्गातील अनेक शिक्षकांना देशविदेशातील अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक ठिकाणे पाहून शैक्षणिक व सामाजिक परिस्थिताचा अभ्यास करण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे. त्यांनी सलग ९ वर्षे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, तर गेली 6 वर्षे ते महाराष्ट्र राज्य संयुक्त चिटणीस म्हणून उत्कृष्टरित्या काम पाहिले. त्यांच्या या कामाची दाखल घेवून नुकतीच त्यांची संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी देखील निवड झालेली आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अनुभव, संघटन कौशल्य व तळमळ लक्षात घेवून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री.दीपक केसरकर यांच्या शिफारशी वरून त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सदस्य म्हणून निवड झालेली आहे. त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक, साहित्य, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.