गोप्या...आता पडदो कोण टाकतलो ?

ऋषी देसाई यांनी जागवल्या आठवणी
Edited by: भरत केसरकर
Published on: March 26, 2024 13:17 PM
views 44  views

मालवणी रंगभूमीने नाट्यसंपदेला किती भरभरुन दिलं यापेक्षा मालवणी जनमानसाला दिलेले जे अपार सुवर्णदान आहे त्याची तुलनाच होऊ शकत नाही.. पण आता टप्याटप्याने रिती होणारी ओंजळ अस्वस्थ करणारी आहे.. वस्त्रहरण या गाजलेल्या नाटकातून गोप्याची भूमिकेतून ज्यांनी महाराष्ट्राला खदाखदा हसवलं ते लवराज कांबळी आज आई भद्रकालीच्या प्रत्यक्ष भेटीसाठी निघून गेले आहेत. लवराजचे निधन झाले आहे हे म्हणणंही फार अवघड आहे. गिताजंली कांबळीच्या निधनानंतर आपल्या जगण्याची लढाई दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर हसत हसत पार करणारा प्रवास आज शांत झाला आहे..

बाबूजी गेले, मोहन तोंडवळकर गेले , लिलाधर कांबळी गेले, आणि आज लवराज कांबळीचे निधन झाले. कोकणची नाट्यपंढरी असणाऱ्या रेवंडी गावची होणारी ही हानी आज महाराष्ट्पाच्या बोलीभाषेच्या रंगभूमीला झालेल्या अपरिमित क्षितीची आहे. बाकी वस्त्रहरण, येवा कोकण आपलाचा आसा, चंपू खानावळीण. देवाक काळजी, वडाची साल पिंपळाक अशा नाटकांच्या यादीत शोधून लवराजची महती नाही समजणार.. आज व्हीफिक्सच्या जमान्यात शेम टू शेम या लक्ष्मीकांतच्या  सिनेमात लवराज आणि अंकूश यांना पाहणे ही आजही स्वताची एक मोठेपणाची आठवण आहे. कांबळी परिवाराने मराठी रंगभूमीला जे भरभरुन दान दिलय ते आज इतिहासात चांदण्या म्हणून लखलखेल एवडं भव्य आहे. लवराजही त्याच पठडीतील. खुप साधी माणसे आणि जमवलेला गोतावळा असा संपन्न आलेख आज एका अल्पविरामाने संपवला . वस्त्रहरणचे वैभव जपणाऱ्या कलावंत मंडळींची एक्झिट ही लाल रिबनच्या पडद्याआडसारखी डोळ्यासमोरुन सरकतेय. 

लवराजच्या अगोदर दिलीप कांबळी कायिक अभिनयाने गोप्या  सजवायचे... लवराजने  त्याला वाचिक सौंदर्य दिले.  वस्त्रहरणच्या मानाच्या नजराण्यातील ही अनेक माणके होती. ती माणकेच होती.. अंधारात राहीली म्हणून माणके हिरे पाचू यांचे मौल्य कमी होत नाही.. आता फक्त आपण या माणसांना प्रत्यक्ष पाहिलय हीच काय ती आमची धनाची पेटी.