मिलाग्रीसमध्ये लॉर्ड बेडेन पॉवेल जयंती उत्साहात

Edited by: विनायक गावस
Published on: February 28, 2024 08:47 AM
views 82  views

सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये स्काऊटचे जनक लॉर्ड बेडेन पॉवेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोलगाव हायस्कूलचे स्काऊट मास्टर अरविंद मेस्त्री उपस्थित होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ऑर्डर देऊन स्काऊट गाईड प्रार्थना गीत म्हटले गेले. त्यानंतर व्यासपीठावर  मान्यवरांच्या हस्ते आणि मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका व सर्व स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन आणि विद्यार्थी यांच्या समवेत ध्वजारोहण झाले. सर्वांनी एकत्रित ध्वज गीत म्हटले.

उर्वरित कार्यक्रम प्रशालेच्या सभागृहात पार पडला. मान्यवरांचे आगमन झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रशालेचे सहाय्यक शिक्षक सुशांत गावडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. स्टेजवर सर्व स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन व प्रत्येक धर्माचे प्रतिनिधिक स्वरूपात एक विद्यार्थी यांनी सर्वधर्मीय प्रार्थना म्हटल्या. प्रत्येक धर्माच्या विद्यार्थ्याने आपल्या धर्माची प्रार्थना म्हटली. सर्वधर्मीय प्रार्थनेनंतर प्रात्यक्षिके पार पडली. सर्वप्रथम आठवी क च्या विद्यार्थ्यांनी सर नीलराज सावंत आणि टीचर रोजा फर्नांडिस तसेच टीचर रुफीना डान्टस यांच्या मार्गदर्शनाखाली गाठींचे प्रात्यक्षिक व त्यांचे उपयोग स्पष्ट केले. तर सर बॉनी डिसूजा व टीचर उर्मिला मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी अ च्या विद्यार्थ्यांनी गॅजेट्स बनवले व त्याचे प्रात्यक्षिक, नाव व उपयोग स्पष्ट केले. सर्व शिक्षक व मान्यवरांनी या प्रात्यक्षिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नंतर टीचर रुफीना डान्टस यांनी चिंतन दिनाचे महत्त्व यावर आपले मनोगत व्यक्त केले. सर सुशांत जोशी यांनी स्काऊट गाईड मधील आरोळी या विषयावर सर्व विद्यार्थ्यांकडून कृतीयुक्त आरोळी म्हणून घेतली आणि सर्व वातावरण पुन्हा एकदा चैतन्यमय केले. इयत्ता सहावी अ च्या विद्यार्थिनींनी टीचर फ्लोरींडा फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड मधील विशेष टाळ्यांचे प्रकार याचे उत्तम सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे  सर मेस्त्री  यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड अभ्यासक्रमावर प्रश्न विचारून स्काऊट गाईडचे महत्त्व पटवून दिले, तसेच मुख्याध्यापकांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वात शेवटी टीचर रोजा रेगे यांनी सर्वांचे आभार मानून मुख्याध्यापकांच्या संमतीने कार्यक्रमाची सांगता केली.