
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण ७३ जागा भरल्या जाणार असून अर्थातच ही चांगली गोष्ट आहे. मात्र या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून तब्बल १७७० रुपये अर्जशुल्क आकारले जात आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गतवर्षी अशाच प्रकारची भरती प्रक्रिया राबविली होती, त्या भरतीसाठी १००० रुपये अर्जशुल्क घेतले होते. मग सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजप पक्षाच्या सत्ताधाऱ्यांकडून लिपिक पद भरतीच्या अर्जासाठी ७७० रुपये चे अतिरिक्त शुल्क का आकारण्यात येत आहे? ७३ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत सुमारे ७ हजार स्थानिक बेरोजगार तरुण - तरुणींनी अर्ज दाखल केले आहेत आणि ज्यांची भरती होणार नाही त्यांना हे अर्जशुल्क मागे देखील दिले जाणार नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजप पक्षाच्या सत्ताधाऱ्यांकडून स्थानिक तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात लूटमार आणि फसवणूक करण्यात येत आहे, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
नाईक यांनी म्हटले आहे, जिल्हा बॅंकेत भरती प्रक्रिया होणार असल्याने अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना बँकेत भरती करण्याची आश्वासने दिली आहेत. तसेच आर्थिक व्यवहार करून काहींची भरती करण्यात येणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे ही भरती स्पर्धात्मक होणार कि नाही, याबाबत साशंकता आहे.त्यामुळे १७७० रुपये अर्जशुल्क भरूनही नोकरीची शाश्वती नाही. तर रत्नागिरी जिल्हा बँकेच्या तुलनेत सिंधुदुर्गच्या उमेदवारांना ७७० रु.चा भुर्दंड सोसावा लागणार असून भरती न झाल्यास उमेदवाराला पैसे मागे देखील दिले जाणार नाहीत.हे पैसे अध्यक्ष आणि सत्ताधारी संचालकांचा खिशात जाणार आहेत, असा आरोप ही वैभव नाईक यांनी केला आहे.