खासगी रुग्णालयांना लाजवेल असे लोकमान्य टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल

Edited by: मनोज पवार
Published on: October 15, 2024 13:15 PM
views 378  views

रत्नागिरी : खासगी रुग्णालयांना लाजवेल असे आणि विशेष म्हणजे नगरपालिकेचे असलेले मजगाव रोड येथील ५० बेडचे अद्ययावत असे लोकमान्य टिळक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल रत्नागिरीकरांच्या सेवेत रूजू झाले आहे. रत्नागिरीतील प्रथितयश आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी या सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालयाची आखणी व उभारणी केली आहे. अत्यंत सुरेख डिझाईन आणि काटेकोरपणे केलेलं हे काम रुग्णांच्या सोयींचा विचार करून केलेलं आहे.

पालिकेच्या ज्या जागेत पूर्वी कोविड रुग्णालय होते त्याच ठिकाणी हे नवीन सुसज्ज रुग्णालयात उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात जनरल वॉर्ड, कॅज्युअल्टी वार्ड, स्वतंत्र महिला व पुरुष वॉर्ड आहेत. संपूर्ण हॉस्पिटल वातानुकूलित असून यातील कोणताही बेड आयसीयुमध्ये त्वरित रूपांतरित करता येतो. या व्यतिरिक्त प्रशस्त बाह्यरुग्ण विभाग ( ओपीडी ), आंतररुग्ण विभागही मोठा आहे. त्याजवळच कन्सल्टंट डॉक्टरांच्या रूम्स आहेत. मेडीकल स्टोअर व लिफ्टची सुविधा आहे. व्हीआयपी रुग्णांसाठी स्वतंत्र डिलक्स रूम आहे. ग्राउंड प्लस चार मजली प्रशस्त इमारत आहे. या रुग्णालयामध्ये दोन अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स असून त्यापैकी एक सुप्रामेजर ऑपरेशन थिएटर आहे; ज्यामध्ये अतिशय किचकट व वेळखाऊ सर्जरी अद्ययावत तंत्र वापरून करता येण्याची सोय आहे.

या रुग्णालयात मेडिकल गॅस पाइपलाइन सिस्टीम (MGPS) बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा म्हणजे ऑक्सिजनचे सिलिंडर्स नेण्याची- आणण्याची गरज नाही. त्याऐवजी हॉस्पीटलच्या तळमजल्यावर ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली असून तिथून पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा सर्व खोल्यांमध्ये करण्यात आला आहे. यामुळेच कोणताही बेड आयसीयूमध्ये त्वरित रुपांतरित करता येतो. हॉस्पिटल अॅक्वायर्ड इन्फेक्शन  (HAI) होऊ नये म्हणन हेपा फिल्टर बसवलेले आहेत. जे उच्च दर्जाचे असून हे फिल्टर 99.97 टक्के हवा शुद्ध करतात. यामुळ सर्जरीनंतर इन्फेक्शन होण्याची शक्यताच कमी होऊन रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.

याशिवाय येथे सर्जरीवेळी उपकरणे घेण्यासाठी थिएटर सारखे उघडबंद करताना हवेशी संपर्क येऊन अशुद्ध होऊ नये आणि शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना हाती उपकरणे घ्यायला नको म्हणून ‘सीएसएसडी’ची सोय करण्यात आलेली असून, तिथून ‘पास बॉक्स’मध्ये उपकरणे येतात, यामुळे उपकरणे आणि वातावरणही अत्यंत शुद्ध राहते. ऑपरेशन थिएटर्स नंतर लगेच रिकव्हरी रूम ( सर्जिकल आयसीयू ) आहे . जिथे अत्यंत नियंत्रित वातावरणात रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकेल, अशी व्यवस्था आहे.

याशिवाय रुग्णांना आजारपणात चांगला आहार मिळावा म्हणून तशी सोय रुग्णालयातच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इथली प्रत्येक गोष्ट अत्यंत उत्तम दर्जाची आणि काटेकोर निगराणीत पूर्ण करण्यात आली आहे. आपल्या कामाच्या दर्जाबाबत अत्यंत काटेकोर मानले जाणारे आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी या रुग्णालयाचे काम अल्पावधीत उत्कृष्टपणे पूर्ण केले आहे.

खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांचे कॉम्बिनेशन असणारे हे रुग्णालय अत्याधुनिक आहे. येथे राज्य सरकार व केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या विविध उपचारांसाठीच्या सवलत योजनांचा लाभ घेता येईल. नगरपालिकेने सार्वजनिक आरोग्यात कार्यरत असलेल्या मुंबईच्या साधना फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात केलेल्या अनेक विकासकामांपैकी गरीब आणि सर्वसामान्य जनतेची मूलभूत गरज ओळखून त्यांच्यासाठी केलेलं हे एक महत्त्वाचं काम मानलं जात आहे.