
मालवण : शासकीय कार्यालये वगळून वीज ग्राहकाचा स्वतःचा अर्ज असल्याशिवाय कुठेही स्मार्ट मीटर बसवू नये, असा शासनाचा स्पष्ट आदेश आहे. असे असताना महावितरणचे अधिकारी कुठेही मनमानीपणे वीज ग्राहकांचा विरोध असतानाही स्मार्ट मीटर बसवत असतील तर आम्हाला महावितरणचे अधिकारी व संबंधिताना मिळतील तिकडे कोंडून ठेवावे लागेल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिला आहे.
चिंदरकर यांनी म्हटले आहे, शासनाची प्रतिमा खराब करण्यासाठीच काही यंत्रणा मुद्दामहून अशा गोष्टी करत आहेत. त्यामुळे जिथे जिथे सर्वसामान्य जनतेला त्रास असणार, तिथे भाजपा निश्चितपणे लोकांच्याच बाजूने असणार. शासन आणि प्रशासन हा जसा फरक आहे, तसा सरकार आणि पक्ष हा फरक सर्वसामान्यांसाठी कायम असणार आहे. काही शासकीय यंत्रणेत बसलेले लोक सरकार आणि आमदार, खासदार, पालकमंत्री यांना बदनाम करण्यासाठी कामे करत आहेत. त्या सगळ्यांची जंत्री पालकमंत्री यांच्याकडे लवकरच देणार असल्याचे धोंडी चिंदरकर यांनी म्हटले आहे.