साहित्य संस्कृतीच माणसाला वैचारीक समृध्दी देते : रमेश सावंत

Edited by:
Published on: January 21, 2024 06:11 AM
views 87  views

कोकणचं पहिलं दैनिक 'दै. कोकणसाद' व कोकणचं नं. १ महाचॅनल 'कोकणसाद LIVE' च्या माध्यमातून 'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा', हे विशेष मालिका सुरु करण्यात आलीय. साहित्यक्षेत्रात योगदान देणारे साहित्यिक व साहित्यप्रेमी यांच्या यामध्ये मुलाखती घेण्यात येतायेत. याच  विशेष मालिकेच्या १३ व्या पुष्पात आपण मुंबईत स्थायिक होऊनही कोकणशी, इथल्या निसर्गाशी आणि संस्कृतीशी घट्ट नाळ जुळलेले ज्येष्ठ साहित्यिक रमेश सावंत यांची दै. कोकणसादचे संपादक संदीप देसाई यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.

जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा..!

पुष्प १३ वं

*कवी रमेश सावंत, मुलाखत प्रश्न*


प्रश्न १

आपल्या लेखनाला प्रारंभ कसा झाला आणि कोणत्या साहित्य प्रकाराच्या लेखनाने

साहित्याची घरात कोणतीही परंपरा नव्हती. पंचक्रोशीतील मी पहिलाच साहित्यिक आहे‌. कवितेची आवड मला होती‌. त्याच कवितेनं मला साद घातली अन् मी साहित्य क्षेत्राकडे वळलो. मुंबई कुर्ला भागाच्या कामगार वस्तीत मी रहायचो. एसएससीनंतर साहित्यिक बाळ राणे यांनी घेतलेल्या एका काव्य स्पर्धेत  भाग घेतला. त्यात माझी कविता बोर्डावर लागली. त्यामुळे हुरुप आला.. प्रोत्साहन मिळालं. पुढे कॉलेज जीवनात सायन्सला गेल्यानं त्यात खंड पडला. नंतर बॅकेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर पुन्हा साहित्याकडे वळलो. 'माझं कोकण' ही पहिली कविता मी लिहीली. त्यानंतर आणि मग मी लिहिता झालो. तदनंतर ८८ कवितांचा गहिवर प्रसिद्ध झाला. गुरुवार्य बाळ राणे यांची त्याला प्रस्तावना आहे. आतापर्यंत पाच काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेत. 'जंगलगाथा' या कवितासंग्रहातून कोकणातील सृष्टी जपलेला निसर्ग व ढासळत पर्यावरण   अधोरेखित केलं आहे. त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. 


प्रश्न २

प्रामुख्याने कवी म्हणून तुमची ओळख आहे. मात्र, इतरही प्रकारात तुम्ही लेखन करता.  आजवर कोणते लेखन प्रकार तुम्ही हाताळले आहेत?

कविता लिहिताना गद्य लिहावस वाटलं. वाचनासाठी पुस्तक येऊ लागली. त्यातून कविता आस्वादनातून गद्य लिहिलं. पुस्तक परिक्षण, आस्वादात्मक समिक्षांसह इतर लेखनाकडे वळलो. लेख, कथा, प्रवास वर्णन आदी लेखन केले. त्याला वृत्तपत्र, साप्ताहिकातून प्रसिद्धी मिळाली व प्रेरणा मिळत गेली. 


प्रश्न ३

साहित्य लेखन करणे ही सुद्धा एक राजकीय कृती असते असं आपण मानता का?

राजकारण हे समाजाच प्रतिबिंब आहे. त्याच्याशिवाय समाज चालू शकणार नाही. कुणीतरी सत्ता चालवली पाहिजे. समाजाचे प्रश्न मांडण्याच काम कुणीतरी केलं पाहिजे. राजकारण वेगळं न समजता लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्याकडे बघितलं तर लोक आणि सरकार यांच्यातील जो दुवा निखळत चालला आहे हा कुठेतरी एकत्रित यावा या दृष्टीने साहित्यिक राजकारणाकडे बघतात आणि त्यांनी ते बघावं. साहित्यिक राजकारणी असो वा नसो. राजकणात जर साहित्यिक असतील तर त्यातील अंतरंग उलगडत जातील. जनतेची गाऱ्हाणी मांडण्याच काम साहित्यिक करतो. त्यांनी ती सत्तेपर्यंत पोहचावीत, त्यांच्यातील दुवा साहित्यिक होऊ शकतो. 


प्रश्न ४

तुम्ही जात, धर्म या सगळ्या पलीकडे निखळ माणूस म्हणून जगण्याला प्राधान्य देत आलात, पण पलीकडे लेखकच जाती - धर्मात अडकताना दिसतोय. या बद्दल काय सांगाल.

भारतात विविध संस्कृतीचा पगडा आहे. भारतात जगातील सर्व धर्म व संस्कृती जोपासत सर्वजण नांदत आहेत. प्रत्येकानं दुसऱ्याशी वितुष्टता न आणता आपलं जरी टिकवल तरी ते सुद्धा पुरेसं आहे. कोकणात सगळ्या जाती संस्कृतीचे लोक मालवणीतून बोलतात. भाषाच आम्हाला जोडत असते. मराठी महाराष्ट्राला आणि हिंदी भाषा अखंड भारताला जोडते. भाषा आणि साहित्य हे एकमेकांशी निगडित आहेत. हा दुरावा साहित्य आणि भाषा दुर करू शकते. 


प्रश्न - ५

आजच्या साहित्यचळवळी या कंपुशाहीचा अड्डा झालाय असं म्हटलं जातं... याविषयी तुमचे मत काय?

मानव हा सामाजिक प्राणी आहे असं आपण म्हणतो. त्याअर्थाने साहित्यिक हा माणूस असल्यानं कंपुगीरी आहे. आताच्या काळात पुर्वीपेक्षा पैसा आहे. आता ज्या पद्धतीने पुरस्कार व प्रसिद्धी मिळू लागली ती पुर्वीच्या लेखकांना नव्हती. आता सोशल मिडियावर कुणीही काहीही लिहू शकतो. पुस्तक काढणं ही प्रक्रिया मात्र कठीण झाली आहे. त्यामुळे चांगलं मागे पडलं. कंपूशाहीमुळे चांगल्या लेखकाला मान्यता मिळत नाही ती मिळाली पाहिजे. कंपुशाही असावी पण, हे असं झालं पाहिजे. 


प्रश्न - ६

आज अशा कंपुशाहीला ओलांडून महाराष्ट्रात कोणत्या साहित्य चळवळी काम करत आहेत?

सिंधुदुर्गच अनुभवल तर समाज साहित्य प्रतिष्ठान व यात काम करणाऱ्या साहित्यिकांनी येथील साहित्य चळवळीला‌ एकप्रकारे उठाव दिलेला आहे. बरेच लेखन प्रकाशित केलं आहे. अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळत आहे‌त. श्रीराम वाचन मंदिर, वैनतेयतून प्रा. प्रविण बांदेकर यांसह जिल्ह्यातील साहित्यिक त्यासाठी झटत आहेत. "कोकणसाद " नं देखील साहित्यिकांना चांगल व्यासपीठ दिले आहे‌. लोकांप्रतिच्या भावना यातून व्यक्त होत आहे. समाजापर्यंत साहित्यिकांचा विचार पोहचत आहे. वैचारिक आदानप्रदान होतंय. अनेक जण, साहित्य संस्था यासाठी प्रयत्न करत आहे यातूनच पिढी घडत जाणार. ग्रामीण भागातील लोक अधिक जागृत आहेत ही बाब महत्त्वाची आहे. 


प्रश्न - ७

तुम्ही चंदेरी दुनिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत असता आणि सिंधुदुर्ग सारख्या ग्रामीण भागातही. तुम्हाला काय वाटतं ? साहित्याचा केंद्रबिंदू आता शहरापेक्षा ग्रामीण भाग झाला आहे ?

जनजीवनाच प्रतिबिंबच साहित्यिकाच्या लेखनातून उतरत असतं . ग्रामीण भागातच खरं जीवन आहे. मी शहरी असलो तरी शहराचा अभिमान बाळगत नाही. शहरात विचार कोंडतात, तिथे वेळ मिळत नाही. कसरत करून लिहाव लागत. पण, खरं जीवन ग्रामीण भागातच दिसत. कोकणातील संघर्ष साहित्यातून उतरायला हवा. आपलं साहित्य ग्लोबल होण आवश्यक आहे. ग्लोबल भागात काय चाललंय ते कोकणात होऊ शकत अशी मांडणी कथा, कादंबरी, नाटकातून झाली पाहिजे. साहित्याचा केंद्रबिंदू जास्त मुंबई, पुण्यात राहिला आहे. मात्र कोकणातही आता लिहीते लोक भरपूर आहेत‌. 

प्रश्न -८

तुम्ही वयाने आणि लेखनानेही ज्येष्ठ आहात. या पार्श्वभूमीवर नव्या लिहिणाऱ्या कवी लेखकांना कोणता संदेश द्याल.

तरुण पिढीला खुप वाव आहे. भाषा, जाती, धर्म या पलिकडे ती आहे. अस्मितेच्या अंगान काही तरूण प्रेरित होतात ही गोष्ट मानवी प्रवृत्तीला साधक आहे. पऱंतु, बाधक हे आहे की त्याची संस्कृती माझी संस्कृती वेगळी आहे म्हणून तो वेगळा आहे. आपण एक समजलं पाहिजे आपण माणूस आहोत. भारतात जन्मल्यान भारत होतो. कुठल्या जाती, धर्मात जन्माला याव हे आपल्या हातात नाही. पण, माणसानं माणसाप्रमाणे संवाद करावा साथ द्यावी, संविधानानं तर प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. साहित्यिक भारताला एकसंघ करत असतात, पुढच्या पिढीनं ते करावं. 


प्रश्न ९ 

साहित्यातील आजच्या अभिरूची विषयी काय सांगाल ?

हा समाज कोणती अभिरूची बाळगतो हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राची संस्कृती मराठी भाषा बोलणारा, संस्कृती जपणारी आहे. अभिरूची बदलण्याच काम करणाऱ्या माध्यमानी पुढच्या पिढीला घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. "कोकणसाद " ते करत आहे. लोक घडली, वाचन संस्कृती वाढली तर ती चांगल्या अभिरुचीनच वाढेल. यासाठी नव्या पिढीत साहित्य, कला व संस्कृतीची अभिरूची निर्माण होणारं आजच्या परिस्थितीवर, व्यवस्थेवर भाष्य करणार लिखाण गरजेचं आहे. माणूसपणात जगत असताना संवेदनशुन्य होऊ नये हाही विचार जपता आला‌ पाहिजे.


शब्दांकन - विनायक गावस