लवकरच सावंतवाडीत साहित्य संमेलन

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची माहिती
Edited by:
Published on: January 25, 2025 16:04 PM
views 207  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम काम करत आहे. लवकरच सावंतवाडी येथे साहित्य संमेलन भरवण्यात येणार आहे अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी दिली. करूळ ग्रंथालय येथे कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखेची जिल्हा कार्यकारणी बैठक शुक्रवारी घेण्यात आली. 

या बैठकीला संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर,  लेखिका उषा परब, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, कवी रुजारियो  पिंटो, आनंद वैद्य, सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष वृंदा कांबळे, कणकवली तालुकाध्यक्ष माधव कदम, प्रा.सुभाष गोवेकर, स्नेहा फणसळकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री नेरुरकरष हायस्कूलचे संचालक गणेश जेठे, ॲड मंदार म्हस्के आदी उपस्थित होते. 

यावेळी श्री कर्णिक पुढे म्हणाले, मला जो पुरस्कार मिळाला आहे तो खऱ्या अर्थाने कोकण मराठी साहित्य परिषदेचा आहे. विश्व साहित्य संमेलनात माझा सन्मान होणार आहे. हा खरा सन्मान या परिषदेच्या सर्वांचा आहे असे मी मानतो. कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई, ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात साहित्य क्षेत्रात शासन स्तरावर दखल घेणारी अशी परिषद मानली जात आहे. हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आहे. आता साहित्य क्षेत्रात ही चळवळ पुढे नेण्यासाठी लेखक घडणे आवश्यक आहे. त्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद पुस्तक प्रकाशन विभाग सुरू करण्याचा मानस आहे. येत्या एप्रिल पासून कोकण मराठी साहित्य परिषद प्रकाशन विभाग सुरू करून साहित्य क्षेत्रात नवी क्रांती घडवण्याच्या दृष्टीने सज्ज झाली आहे. लेखकांकडून पैसे घेऊन पुणे मुंबई येथील प्रकाशन संस्था काम करत आहेत. आता यापुढे कोकणातील आणि विशेषता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दर्जेदार लेखक घडावेत यासाठी पुस्तक प्रकाशन विभाग सुरू केला जाणार आहे. यासाठी एक समिती ही गठीत केली जाणार आहे. मेरिट नुसार लेखकाने लिहिलेले त्यांना प्रकाशन करून देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे यापुढे आता पुणे मुंबई येथील प्रकाशनाकडे येथील लेखकांना हात पसरावे लागणार नाहीत असे ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, साहित्य चळवळ व्यापकतेने वाढवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी संस्थांमध्ये भव्य दिव्य असे दर्जेदार साहित्य संमेलन लवकरच भरवले जाणार आहे. त्याची जबाबदारी सावंतवाडी शाखेवर सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी उत्तमरित्या सावंतवाडी शाखा पार पाडेल. सावंतवाडी कुडाळ मालवण या शाखांचे साहित्य चळवळीतले काम उत्तम दर्जाचे सुरू आहे. याबद्दल त्यांनी कौतुक केले. कणकवली शाखा नव्याने सुरू करण्यात आली आहे. या शाखेनेही चांगले काम करावे अशा शुभेच्छा दिल्या. 

आजच्या बैठकीत वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर म्हणाले, मी वस्त्रहरण नाटक लिहिले आणि मालवणी भाषेला एक वेगळ्या धरतीवर आज पाहिले जात आहे. पु ल देशपांडे यांनी हे नाटक पाहिल्यावर मला हे नाटक पाहण्यापेक्षा एखादी भूमिका करता येईल का अशी स्तुती केली होती. एवढी आपल्या बोली भाषेत ताकत असल्याचे ते म्हणाले. आपल्या बोली भाषेवर साहित्य लेखन होणे आवश्यक आहे आणि ते काम कोकण मराठी साहित्य परिषदेने पुढे न्यावे असे ते म्हणाले. 

यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी केशवसुतांचे गाव हे पुस्तकांचे गाव म्हणून लवकरच जाहीर होणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामान यांच्याकडे आम्ही तशी मागणी केली आहे. जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. केशवसुतांचे गाव आता पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदच्या माध्यमातून विश्व साहित्य संमेलन भरवले जात आहे. साहित्य चळवळ व मराठी भाषा व्यापकतेने पुढे नेण्याच्या दृष्टीने साहित्य संमेलन घेतली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने यंदापासून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून पद्मश्री मधुमकेश कर्णिक यांच्या नावाने दरवर्षी आदर्श साहित्य कार्यकर्ता पुरस्कार दिला जाणार आहे. असे मंगेश मसके यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण मराठी साहित्य परिषद व सर्व तालुके उत्तमरित्या काम करत आहेत.विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष माधव कदम, कुडाळ तालुकाध्यक्ष वृंदा कांबळी यांनी तालुक्याचा आढावा स्पष्ट केला.