खांबाळेच्या भजनस्पर्धेत कणकवलीचे लिंगेश्वर पावणादेवी मंडळ विजेते

Edited by:
Published on: December 24, 2023 16:08 PM
views 84  views

वैभववाडी : खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टीच्या सप्ताह तथा जत्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत जानवलीचा श्री.लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. कुडाळच्या नटराज भजन मंडळाने द्वितीय तर रत्नागिरीचे गजानन भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला.ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारों रसिकांनी  गर्दी केली होती.

श्री.देवी आदिष्टीच्या सप्ताह व जत्रोत्सवानिमित्त देवस्थान उपसमितीच्या माध्यमातुन राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील १३ भजन मंडळांना निमत्रिंत केले होते.या स्पर्धेचा शुभारंभ भजनसम्राट बुवा विजय परब आणि बुवा प्रकाश पारकर यांच्या हस्ते झाले.तर बक्षिस वितरण सोहळा साळुंखे टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सचे संचालक अरूण साळुंखे आणि मान्यवरांच्या हस्ते झाला.ही स्पर्धा अतिशय रंगतदार झाली.स्पर्धा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे

प्रथम क्रमांक- श्री.लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ,जानवली,द्वितीय क्रमांक-नटराज प्रासादिक.भजन मंडळ,पिंगुळी,

तृतीय क्रमांक-गजानन प्रासादिक.भजन मंडळ देवरूख,काटवली,चतुर्थ क्रमांक-लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ असरोंडी,मालवण,पाचवा क्रमांक-सिंध्दीविनायक प्रासादिक भजन मंडळ जानवली,वैयक्तिक बक्षिसे-उत्कृष्ट गायक- बुवा योगेश मेस्त्री,उत्कृष्ट हार्मोनियम-बुवा दूर्गेश मिठबावकर,उत्कृष्ट पखवाज-हेमंत तवटे,उत्कृष्ट कोरस-बालमित्र फोंडाघाट,उत्कृष्ट झांजवादक-शंकर सावंत,उत्कृष्ट तबला-किरण लिंगायत,ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री.देवी आदिष्टी देवस्थान उपसमितीचे सर्व पदाधिकारी,गावातील आणि मुंबईतील ग्रामस्थांनी सहकार्य केले.

भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जेष्ठ भजनी बुवा विजय परब यांनी नवोदित बुवांना मोलाचा सल्ला दिला.ते म्हणाले, भजन ही आपली संस्कृती आहे.भजन हा नामस्मरण आणि संस्कारांचा उत्तम मार्ग आहे.ही एक कला देखील आहे.समाजात प्रबोधनासह चांगली दिशा देण्याचे काम भजनातुन केले जाते त्यामुळे भजन संस्कृती जपण्याचे काम सर्वानी एकजुटीने केले पाहीजे.दर्जेदार भजन स्पर्धेतुन नवनवीन तरूणांना संधी प्राप्त होत असल्याचे मत यावेळी  व्यक्त केले.