
सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लवकरच दोन लिफ्ट बसवण्यात येणार आहेत. यामुळे वृद्ध, दिव्यांग, लहान मुलं आणि महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्म १ आणि ३ वर चढणे-उतरणे सोयीचे होईल. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं यासाठी पाठपुरावा केला होता. याला यश आल्याची माहिती सचिव मिहीर मठकर यांनी दिली.
या लिफ्टसाठीचं टेंडरही मंजूर झालं आहे. तसेच सावंतवाडी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म ३ वर १७० मीटर लांबीचं निवारा शेड उभारण्यासाठी देखील टेंडर निघणार आहे. १७ मार्च रोजी बेलापूर येथे झालेल्या बैठकीत त्यांनी कोकण रेल्वेकडून लिफ्ट आणि निवारा शेड मंजूर करून घेतले होते अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी 'कोकण रेल्वे समस्या आणि उपाय' यामध्ये दिली होती. या कामांसाठी टेंडर निघाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या यशामुळे सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनस बनवण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.