
सावंतवाडी : अनेकदा आपल्या जीवनात येणारी वाईट परिस्थितीसुद्धा आपल्याला पुढे घेऊन जाणारी असते, फक्त आपण तिच्याकडे त्यादृष्टीने पाहिले पाहिजे. पुढे पडणारे पाऊलच विकास घडवते असे नाही, तर दोन पावले मागे पडली तरी जिद्दीने आपण पुढे जाऊ शकतो, असा विश्वास मुंबई आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका व युवा आयडॉल अनघा मोडक यांनी दिव्यांग बांधवांच्या कार्यक्रमात व्यक्त केला.
साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ‘जगण्याचे गाणे होताना!’ या प्रेरणादायी विषयावर दिव्यांगाना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी सिंधुदुर्गातील दिव्यांग संस्थांचा तसेच सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ उद्योजक दादा परुळेकर, रा. प. जोशी, हनुमंत देसाई, साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा रुपाली पाटील, उपाध्यक्ष श्रीलेखा दामले, नम्रता माडये, उमेश हडकर, सतीश भांडारकर, प्रा. दीपक पाटील, श्रीधर दामले, साबाजी परब, महादेव चव्हाण, प्रभाकर देवधर, ज्योती मडकईकर, सखाराम नाईक, न्हानू देसाई, सुनेत्रा खानोलकर, प्रवीण सूर्यवंशी, द्रौपदी राऊळ, रुपाली मुद्राळे, विदिशा सावंत, प्रियांका कडगावकर, प्राजक्ता माळकर, ‘सामाजिक बांधिलकी’चे अनिल परुळेकर, संजय पेडणेकर, रवी जाधव, देव्या सूर्याजी, बाळ बोर्डेकर, विधिशा सावंत, प्रियांका कडगावकर आदी उपस्थित होते.
अनघा मोडक स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाल्या, वयाच्या २४ व्या वर्षी वडिलांचे निधन आणि २५ व्या वर्षी एका आजारात माझी अचानक नजर गेली. मात्र खऱ्या प्रयोगाला तेव्हाच सुरुवात झाली. तेव्हापासून मी जीवनाकडे डोळसपणे पाहू लागले. आयुष्यात येणारी प्रत्येक वाईट परिस्थिती आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठीच आलेली असते. केवळ तिच्याकडे आपण दूरदृष्टीने पाहिले पाहिजे. आयुष्याच्या वाटेवरील काटे वेचत पुढे गेले पाहिजे. तिसऱ्या अंकानंतर तुमच्या कल्पनेचे वास्तवात रुपांतर होणे, यालाच आयुष्याचे नाटक म्हटले जाते. बऱ्याच वेळा दुःखाच्या एका क्षणामुळे आपण आयुष्यातील सगळी सुखे विसरून जात जगण्याचा आनंद गमावतो. त्यामुळे वाईट परिस्थितीचा विचार न करता त्यातून सुद्धा आपल्याला काय चांगले शिकता येते, याचा विचार करावा आणि त्या दृष्टिकोनातून पुढचा प्रवास सुरू ठेवा.
प्रास्ताविक अध्यक्षा रुपाली पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी तर आभार प्रदर्शन न्हानू देसाई यांनी केले.
'आसामिसा' समर्थपणे राबवूया ! - रुपाली पाटील
कार्यक्रमात साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रूपाली पाटील यांनी 'आसामिसा' ही मोहीम समर्थपणे राबविण्याचे समाजातील दात्यांना आवाहन केले. 'आसामिसा' अर्थात 'आपण सारे मिळून सांभाळूया!' आणि आपल्या दिव्यांग बांधवांना उभारी देऊया, असे भावनिक आवाहन रुपाली पाटील यांनी केले. यासाठी समाजातील दात्यांनी आपल्या पद्धतीने सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचेही आवाहन पाटील त्यांनी केले. यासाठी साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व दिव्यांग विकास केंद्र, सावंतवाडी येथील कार्यालयालाही सामाजिक कार्यकर्ते व दात्यांनी भेट देऊन उपकृत व्हावे, असे पाटील यांनी सांगितले.