
वेंगुर्ले : रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर आधारित असलेल्या दायित्व या लघुपटाला उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ९ जून २०२४ रोजी निर्मिती फिल्म क्लब आयोजित तिसरा राजर्षी राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात शंभरहून अधिक लघुचित्रपट सहभागी झाले होते. यातून वेंगुर्लेतील कलाकारांचा सहभाग असलेल्या "दायित्व" या लघुचित्रपटाचा आशय आणि लघु चित्रपटाचा दर्जा पाहून उत्कृष्ट लघुचित्रपट म्हणून याची निवड करण्यात आली.
ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे, खराब रस्ते त्यातून लोकांना होणारा त्रास यावर आधारित या लघुचित्रपटाची कथा आहे. निर्माता विद्देश आईर आणि अथर्व मराठी प्रस्तुत दायित्व या लघुचित्रपटामध्ये मालवण येथील सुप्रसिद्ध कलाकार नमिता गावकर (वेतोबा मालिका फेम) यांची प्रमुख भूमिका आहे. तसेच वेंगुर्ला रोटरी क्लबचे प्रेसिडेंट योगेश नाईक, सुहास मांजरेकर, डॉ. भक्ती भिसे-कांडरकर, रघुनाथ कुडपकर, दिनेश पालव, सुहासिनी परब, वैभवशाली कावले, शर्मिला पालव, बालकलाकार कारूण्या परब, नरहरी खानोलकर आणि वेंगुर्लेतील ज्येष्ठ नाट्यकर्मी रमेश नार्वेकर यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. या लघुचित्रपटामध्ये सुभाष नाईक मुंबई यांनी गीतलेखन केले असून गीत गायक कपिल कांबळे यांनी आपल्या आस्था रेकॉर्डिंग स्टुडिओ (सावंतवाडी- कोलगाव) येथे संगीतबद्ध केले आहे.
यातील वेशभूषा, रंगभूषा नेपथ्याची जबाबदारी मयूर पवार यांनी सांभाळली असून याचे दिग्दर्शन मराठी हिंदी चित्रपट वेब सिरीज तसेच नुकत्याच गाजलेल्या वेतोबा या मालिकेमध्ये पोलिसाची भूमिका साकारलेल्या वेंगुर्ल्यातील मनोहर कावले यांनी केले आहे. तसेच त्यांनी दायित्व, कायापालट, एकदा दाणा (मुखपट), क्ष.. शिक्षणाचा यासारख्या लघुचित्रपटांना दिग्दर्शन केले आहे. हे चारही लघुपट तुम्हाला अथर्व मराठी या यूट्यूब चैनल वर पाहायला मिळतील तर या सर्व लघु चित्रपटांमध्ये वेंगुर्ल्यातील नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली आहे.