
वैभववाडी : काहीजणांनी सत्तेसाठी पक्षाची साथ सोडली.मात्र आपण न डगमगता जनतेच्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढुया. सर्वांनी एकसंधपणे काम करून तालुक्यात पुन्हा शिवसेना बळकट करूया. संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुढाकार घ्यावा,” असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.
वैभव नाईक यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर ते आज वैभववाडीत आले होते.यावेळी तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री.नाईक म्हणाले, “शिवसेना संघटना सध्या अडचणीत आहे. त्या स्थितीतही मी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.ही जबाबदारी केवळ जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या विश्वासावर घेतली आहे.या शिवसैनिकांच्या जोरावर पुन्हा संघटना उभी करुया असं आवाहन केलं. ते पुढे म्हणाले, काहीजण सत्तेसाठी दूर गेले असले, तरी शिवसैनिक आणि सामान्य जनता आपल्या सोबत आहे. त्यांचा विश्वास जपण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. ज्या ठिकाणी माझी गरज भासेल, तेथे जिल्हाप्रमुख म्हणून मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असा विश्वास व्यक्त केला.
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक म्हणाले, “वैभव नाईक यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जि.प. निवडणुकीत वैभववाडीतील निष्ठावंत उमेदवारांनी प्रलोभने नाकारून चांगली लढत दिली. आज विजय मिळाला नसला तरी उद्याच्या विजयासाठी आतापासून संघटना वाढवणे आवश्यक आहे. शिवसेनेत युवा वर्गाची सक्षम फळी उभी करुया असं आवाहन केलं.
यावेळी तालुकाप्रमुख नंदू शिंदे, तालुका संघटक लक्ष्मण रावराणे, गुलझार काझी, माजी तालुकाप्रमुख अशोक रावराणे, सोशल मीडिया प्रमुख विठोबा गुरव तसेच अनिल नराम, अनंत नांदलकर, दीपक चव्हाण, पंढरीनाथ सुर्वे, रविंद्र रावराणे, संतोष पाटील, मयूर सुर्वे, संतोष जाधव, रंजित रावराणे, प्रकाश धोंड, समीर लांजेकर, संदीप कोलते, प्राची कोलते, कल्याणी शिंदे, जगन्नाथ शिंदे, स्वप्नील रावराणे, सूर्यकांत परब, राजेश तावडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










