'चला जाणूया नदीला' अभियानाचं आढाळीत जोरदार स्वागत !

कडशी नदी संवाद यात्रेला चांगला प्रतिसाद
Edited by: संदीप देसाई
Published on: January 11, 2023 18:14 PM
views 180  views

दोडामार्ग : जिल्ह्यात सुरू असलेल्या' चला जाणूया नदीला..' या अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कडशी नदी संवाद यात्रेचे आडाळीत जोरदार स्वागत झाले. यावेळी ग्रामस्थ आणि अधिकारी यांच्यात नदी संवर्धन व स्थानिकांचे प्रश्न याबाबत सखोल विचारविनिमय झाला. दरम्यान, आडाळी सरपंच पराग गांवकर व ग्रामस्थांनी बंदिस्त सभागृहात नदी संवाद कार्यक्रम न करता नदीच्या काठावर केलेल्या आयोजनाबद्दल अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शासनाकडून नदी संवर्धनसाठी 'चला जाणूया नदीला..' हे अभियान राबविण्यात येत आहे. यात कडशी नदीचा समावेश करण्यात आला आहे. पडवे माजगाव येथे उगम असलेली ही नदी मोरगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल व नेतार्डे मधून वाहत जाऊन गोव्यात तेरेखोल नदीला मिळते. या नदीच्या प्रवाहातील अडथळे समजून घेऊन पात्र प्रवाही करणे, पात्र व जल संवर्धन करण्यासाठी उपाययोजना राबविणे आदी साठी नावीन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध होणार आहे.

त्याचाच भाग म्हणून नदी वाहत असलेल्या गावातील रहिवाशांसोबत प्रशासनाने संवाद यात्रा आयोजित केली होती. आज आडाळीत ग्रामस्थ व अधिकारी यांच्यात नदीच्या संवर्धनबाबत चर्चा झाली. यावेळी अभियान समितीचे सदस्य सचिव कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, उपविभागीय अभियंता सं. द. कविटकर, समन्वयक जयेश सावंत, उपविभागीय जलसंधारण अधिकारी व्ही. आर. मोहिते, मंडळ अधिकारी राजन गवस, बी. के. आयनोडकर,उपविभागीय अभियंता सं. द. कविटकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी व्ही. आर. मोहिते, मंडळ अधिकारी राजन गवस, बी. के. आयनोडकर, वनपाल संग्राम जितकर , तलाठी पवन लोले, ग्रामपंचायत सदस्य संजना गांवकर, सानिका गांवकर, विशाखा गांवकर, निशा गांवकर,अमोल परब, लक्ष्मण मेस्त्री, ग्रामसेवक कुणाल मसके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. कविटकर यांनी अभियानाची रूपरेषा मांडली.


श्री. श्रीमंगले म्हणाले ' नदीवर अवलंबून असलेल्या स्थानिकांच्या सूचना लक्षात घेऊन काम केलं जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांशी संवाद करण्यासाठी ही यात्रा आहे. सरपंच पराग गांवकर यांनी नदी संवाद यात्रेचा कार्यक्रम बंदिस्त सभागृहात न घेता नदीकाठी मंडप उभारून घेतला. त्यामुळे प्रत्यक्ष नदीच्या सानिध्यात स्थानिकांशी संवाद साधता आला. तसेच आडाळी ग्रामस्थांनी यापूर्वीच गाळ काढून ओढा पुनरुज्जीवन केले. स्वखर्चाने नदीतील गाळ काढला. नदीविषयी ग्रामस्थांना असलेली आस्था ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे श्री. श्रीमंगले म्हणाले. 

सरपंच श्री. गांवकर म्हणाले ' चार वर्षांपूर्वी आम्ही लोकसहभाग, श्रमदानातून ओढा पुनःरुज्जीवन काम केले होते. तसेच नदीतील गाळही काढला होता. आता शासनाने हे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये केवळ कामासाठी काम न होता नदीच्या संवर्धनासाठी काम व्हायला हवे. म्हणून नदीची इको- सिस्टीम देखील राखली जावी. उन्हाळी वायंगणी शेतीमधून पाण्याचा निचरा होऊन भुजल पातळी वाढत होती.  मात्र वन्यप्राणी उपद्रवमुळे शेती बंद झाली. आता ही शेती पुनःरुज्जीवन करण्यासाठी वनविभागाची महत्वाची भूमिका  राहील.

यावेळी ग्रामस्थ जयप्रकाश गांवकर, भिवा गांवकर, संजय गांवकर, विलास गांवकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.