काठी न घोंगडं घेऊ द्या की र..आमचा बी विकास होऊ द्या की र !

धनगरी वेषभुषेत 'सीईओ' झळकले !
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 04, 2023 18:48 PM
views 190  views

कुडाळ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी गोठोस येथे धनगरी वेश परिधान करीत नरेगा अंतर्गत मजुरांशी संवाद साधला. काठी ..नी.. घोंगड घेऊ द्या की र आमचा बी विकास होऊ द्या .. अशी साद त्यांना घालण्यात आली.. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ही आगळीवेगळी भेट लक्षवेधी ठरली..

नरेगा मजुरासोबत एक दिवस या मोहिमेच्या निमित्ताने मूख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी नरेगाच्या मजुरांसोबत एक दिवस घालवून त्याच्याशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न आदी समजून घेतले. 

कुडाळ तालुक्यातील निवजे व गोठोस या दोन्ही गावातल्या लोकांना नरेगा अंतर्गत गोठे, गोबरगॅस, गांडूळ युनिट, खत विहिरी देण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते बुधवारी झाला. दोन्ही गावातील 155 शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पंचायत समितीने पाऊल टाकले आहे.

या दोन्ही गावातील शेतकऱ्यानी हरीयाणा व पंजाब येथून म्हशी आणून दूध संकलन करण्याचा प्रयत्न सुरू केला. या जनावरांसाठी चांगले गोठे तयार करण्याची सुरुवात पंचायत समिती मार्फत सुरू केली आहे. एका जनावरासाठी रु 77 हजार अनुदान दिले जाते. त्याला जोडूनच गोबर गॅस पूरक आहे. गांडूळ युनिट दिल्यास अधिक जोड मिळेल खत निर्मिती द्यायची, अशा चार योजनेचा लाभ या शेतकऱ्याना दिला जाणार आहे.


नरेगा अंतर्गत विहिरीचासुध्दा लाभ दिला जाणार आहे, या अनुषंगाने निवजे गावातील 91 शेतकऱ्यांसाठी गोठे 54  शेतकऱ्यांसाठी गांडूळ युनिट 8 जणाना विहिरी तर निवजे गावात 65 शेतकऱ्यांसाठी गोठे गांडूळ कुक्कुटपालनासाठी शेड खत आदी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.   

या उपक्रमामुळे गोठोस व निवजे येथील 155 शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत. यासाठी पंचायत समिती कुडाळने पावले उचलली आहेत, यासाठी जिल्हा बँक व भगीरथ प्रतिष्ठान, झाराप यांचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली. 

त्यानिमित्त बुधवारी गावात जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शुभारंभ केला. काही उपक्रमांची पाहणी केली.. यावेळी धनगर समाजाच्या वस्तीलाही भेट देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी गावात जाऊन ग्रामस्थांना आपलंसं केलं. विशेष म्हणजे खांद्यावर घोंगडी हातात काठी टोपी या धनगरी वेष परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधलं. काठी न घोंगड घेऊ द्या की र आमचा बी विकास होऊ द्या की र असं साकडं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घालण्यात आलं.


यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर गोठोस ग्रामसेवक गुरुनाथ गावडे, निवजे ग्रामसेवक सुषमा कोनकर, दीपक खरात दोन्ही गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी महिला वर्ग लाभार्थी आदी उपस्थित होते.