श्रेय कुणीही घेऊ दे ; सावंतवाडीला २५ वर्षांनी मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा विकासकामातून घेऊ : दीपक केसरकर

Edited by: विनायक गावस
Published on: July 10, 2023 13:53 PM
views 78  views

सावंतवाडी : आंबोलीतील पर्यटनाच्यादृष्टीने घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांबद्दल येथील आंबोली आणि गेळे येथील ग्रामस्थांच्यावतीने येथील माऊली मंदिरात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि गेळे येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांचा मागील २३ वर्षांपासून प्रलंबित कबुलायतदार प्रश्न सोडविण्यात यश आले आहे.

त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळणार आहेत. त्यामुळे येथील शेतकरी, ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय कुणीही घेऊ दे, आपल्या सावंतवाडी तालुक्याला २५ वर्षांनंतर मंत्रिपद मिळाले आहे. त्याचा फायदा घेऊन विकासकामे करून घेऊ या. तालुक्यासह जिल्ह्याचे उर्वरित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करेन, अशी ग्वाही याप्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  

यावेळी शासकीय अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी व दोन्ही गावांतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.