
सावंतवाडी: कास (दाभाळवाडी ) येथे भरवस्तीत दहशत माजवलेल्या बिबट्याला उपवनसंरक्षक मीलीश शर्मा,सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे,वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर यांनी सापळा रचुन दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले.
गेले दोन महीने कास (दाभाळवाडी )व परिसरात भरवस्तीत बिबट्याने दहशत माजवली होती.पाच ते सहा पाळीव कुत्रे, बकरी यांना भक्ष केले होते. वारंवार हा बिबट्या ग्रामस्थांच्या दृष्टीस पडत होता. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते.याबाबत वारंवार येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला होता.
सध्या काजूचा हंगाम सुरू झाला मात्र बिबट्याच्या भीतीने ग्रामस्थ काजू बागेत जाण्यास घाबरत होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या घराच्या अंगणात येऊन भक्ष करत असल्याने भीतीचे वातावरण पसरले होते.
त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याला पकडण्याची मागणी केली होती.अखेर या त्यांच्या मागणीला यश येत ,काल सायंकाळी बबन रेडकर पथकासमवेत दाखल झाले.बिबट्या सांयकाळी सहा वाजता नेहमी प्रमाणे भक्षाच्या शोधात आला असता पिंजऱ्यात असलेल्या बकरीला भक्ष बनवण्यासाठी पिंजऱ्यात गेल्याने बिबटा जेरबंद झाला.
यावेळी सुभाष भाईप, योगेश भाईप, शुभम फाटक, आनंद राणे, देवेंद्र परब,गोपाळ सावंत, राकेश आम्रुसकर,वनरक्षक प्रकाश रानगीर, वनसेवक चंद्रकांत पडते हे सहभागी झाले होते.










