
दोडामार्ग : आम्ही कोणावर टीकाटिपण्णी करायला आलो नाही मात्र जनतेचा कौल हा आमच्या म्हणजेच महायुतीच्या बाजूनेच आहे माटणे जिल्हा परिषद मधील उमेदवार रामा उर्फ दीपक गवस हा माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाला मत निवडून द्या त्याचा विजय म्हणजे माझा विजय हे येत्या ९ तारखेला स्पष्ट दिसणार आहे. विजयाचा गुलाल उधळायची वेळ आली आहे असा ठाम विश्वास भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी दोडामार्ग तालुक्यात महायुतीच्या प्रचारात दौऱ्या वेळी व्यक्त केला आहे. विशाल परब यांच्या झंझावाती प्रचारामुळे संपूर्ण तालुक्यात महायुतीचा प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
युतीचा बुस्टर आमच्याकडे - दोडामार्ग तालुक्यात भाजप–शिवसेना महायुतीकडे युतीचा बुस्टर असून संघटन, नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ताकद यामुळे कमळ फुलणार असून आमचा विजय प्रचंड मताधिक्यांनीच होणार, असा ठाम विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला आहे. आता भाकरी परतण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट सांगत त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. महायुतीची ताकद जनतेपर्यंत पोहोचत असल्याने विरोधक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत असेही श्री. परब म्हणालेत.

सावंतवाडीचा चमत्कार दोडामार्गमध्ये घडणार- सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत जे राजकीय चित्र दिसले, तोच चमत्कार आता दोडामार्गमध्ये घडणार असल्याचे परब म्हणाले. दोडामार्गमधील ही निवडणूक जिल्हा परिषद प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जात आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर दोडामार्गच्या सर्वांगीण विकासासाठी आहे असे सांगत विशाल परब यांनी महायुतीच्या विकासात्मक अजेंड्याची माहिती दिली. यावेळी महायुतीचे जि.प. उमेदवार व भाजप दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस, शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती उमेदवार पार्वती गवस, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शहराध्यक्ष राजेश फुलारी, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, उपतालुकाध्यक्ष सुनील गवस, स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, शाणी बोर्डेकर, शिरीष नाईक, माटणे सरपंच महादेव गवस यांच्यासह बूथ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










