आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सव ‘प्लास्टिक मुक्त’ करण्याचा निर्णय

जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडून व्यापक अभियान; व्यापारी व भाविकांना सहकार्याचे आवाहन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 03, 2026 21:08 PM
views 41  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला असून, त्याअनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारा आंगणेवाडी यात्रोत्सव तसेच १५ ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणारा कुणकेश्वर यात्रोत्सव हे दोन्ही यात्रोत्सव “प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव” म्हणून साजरे करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र खेबुडकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनमार्फत शालेय स्तरावर प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धा, मंदिर व परिसर स्वच्छता, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा व शाळा परिसर स्वच्छता, तसेच समुद्रकिनारा स्वच्छता असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आंगणेवाडी व कुणकेश्वर हे जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रोत्सव असून, या ठिकाणी लाखो भाविक व व्यापारी उपस्थित राहत असल्याने मोठ्या प्रमाणात जैविक व प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्यामुळे या ठिकाणी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.

यात्रोत्सवाच्या कालावधीत “प्लास्टिक मुक्त यात्रोत्सव” या संकल्पनेचा प्रचार बॅनर, वर्तनपत्रे व सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मंदिर व परिसरात कचरा कुंड्यांचे योग्य नियोजन करण्यात येईल. तसेच हॉटेल व फूड स्टॉल चालकांना जैविक व प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करण्यासाठी निळ्या व हिरव्या रंगाच्या कचरा पिशव्या किंवा कुंड्या देण्यात येणार असून, जमा झालेला कचरा त्यांनी स्वतंत्रपणे साठवून ठेवणे बंधनकारक राहणार आहे. जैविक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ठिकठिकाणी तात्पुरते कंपोस्ट खड्डे तयार करण्यात येणार आहेत.

यात्रोत्सवात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून स्वच्छता कर व स्वच्छता डिपॉझिट आकारण्यात येणार असून, त्यांनी आपल्याकडील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास ही रक्कम परत केली जाणार आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार ज्या व्यापाऱ्यांकडे सिंगल युज प्लास्टिक आढळून येईल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्गवासीय, भाविक व व्यापाऱ्यांनी जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि ९ फेब्रुवारी २०२६ रोजी आंगणेवाडी तसेच १५ ते १७ फेब्रुवारी २०२६ रोजी कुणकेश्वर यात्रोत्सव “प्लास्टिक मुक्त” करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे.

बॉक्स

आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यायी वस्तूंचा वापर करावा. यात्रोत्सवात सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.