
कणकवली : रेल्वे मार्गावरून जात असलेल्या मालगाडीला धडकून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना कसाल - कार्लेवाडी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. मालगाडीच्या धडकेने गंभीर जखमी बिबट्या रेल्वे ट्रॅकनजीकच्या झुडपामध्ये लपला होता. रेल्वे सुरक्षा बल व वन विभाग कर्मचार्यांनी त्याला जेरबंद करून पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटना अशी, रेल्वे मार्गावरून जात असलेल्या मालगाडीची रेल्वे ट्रॅकवर आलेल्या बिबट्याला धडक बसली. पहाटे ४.३० वा. सुमारासच्या या घटनेनंतर सदर मालगाडी कणकवली रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर मोटरमनने स्टेशनमास्तर आनंद चिपळूणकर यांना कल्पना दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बालाचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदलार अनंत मेलशिंगरे आदी कसाल - कार्लेवाडी येथे दाखल झाले. मात्र, बिबट्या दिसून येत नव्हता. दुर्गेश यादव, अनंत मेलशिंगरे यांनी झुडुपांमध्ये छोटे दगड मारले असता एका झुडूपामधून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला.
रेल्वे सुरक्षा विभागाने कळविल्यानुसार वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर सकाळी ६.३० वा. बिबट्या जेरबंद झाला. त्याच्या डोक्याला, पाठीला गंभीर दुखापत झाली होती. बिबट्याला तात्काळ कुडाळ येथील पशु वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बिबट्या मृत्यूमुखी पडला.