
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. कोणाचे आमदार फुटणार, कोणाचे क्रॉस व्होटिंग करणार याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या असून आतापर्यंत भाजपासह इतर पक्षांच्या ३५ आमदारांनी मतदान केले आहे. शिवसेना ठाकरे गट, अजित पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदारांनी सुद्धा मतदान केल आहे. विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. यानंतर सायंकाळी निकाल येणार आहे.
या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर, शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी, कृपाल तुमाने राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राजेश विटेकर, शिवाजी गर्जे कडून प्रज्ञा सातव शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर तर शेकाप कडून जयंत पाटील निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी जोरदार चुरस पहायला मिळत आहे. 12 पैकी एका उमेदवाराचा पराभव होणार आहे. त्यातील कोणाचा पराभव होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
असे आहे मतांचे गणित !
भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात. शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे ३९ आमदार असून त्यांना १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सुस्थितीत आहेत. शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वत:च्या पक्षाचे एकच आमदार आहेत. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे १५ आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे १६ मते आहेत. त्यांना आणखी सात मतांची जुळवाजुळव करावी लागेल. अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्यांना आणखी सात मते लागतील. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचे गणित जुळेल, असे म्हटले जात आहे. उद्धवसेनेकडे १५ आमदार आहेत, त्यांना आणखी ८ मते लागतील. एक अपक्ष त्यांच्यासोबत आहेत. काँग्रेसची मते या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची आहेत. त्यांच्याकडे ३७ मते आहेत आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ २३ मते लागतील. काँग्रेसकडे १४ मते अतिरिक्त आहेत, ती कुठे वळतात यावर बरेच अवलंबून असेल.