
सावर्डे – सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन या विषयावर वन्य पशुसंवर्धन संघटना गुजरातचे नामांकित डॉ. राहुल भागवत यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहात संपन्न झाले.
पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. भागवत यांनी भारतातील नैसर्गिक सौंदर्यात भर टाकणारे पशू-पक्षी, स्थलांतरित पक्ष्यांचा प्रवास, त्यांचे महत्त्व आणि त्यांचे मूळ वास्तव्य याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की भारतात सुमारे 1364 प्रजातींचे पक्षी आढळतात, तर कोकणात साधारण 650 प्रजातींचे पक्षी आढळतात. भारताचे राष्ट्रीय फुलपाखरू, राष्ट्रीय भाजी तसेच महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मोन यांचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
झाडांचे महत्त्व सांगताना त्यांनी लक्षवेधी आकडेवारी मांडली – एक झाड आपल्या संपूर्ण आयुष्यात साधारण 10 कोटी रुपयांचा ऑक्सिजन आपल्याला मोफत देते. तरीसुद्धा माणूस पृथ्वीवरील केवळ 1% असूनही 99% नैसर्गिक संसाधनांचा उपभोग घेतो आणि वृक्षसंवर्धनास कमी प्राधान्य देतो, असे त्यांनी खेदाने नमूद केले. वृक्षसंवर्धनाचा संदेश पसरवण्यासाठी डॉ. भागवत यांनी इयत्ता 11 वीतील विद्यार्थ्यांना झाडांची बियाणे भेट दिली व त्याचे संगोपन कसे करावे याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना झाडे संवर्धित करण्याचे आवाहन केले.
जंगल व त्यातील जैवविविधतेची ओळख असण्याचे फायदे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, जंगलातील प्राणी-पक्ष्यांची माहिती पर्यटकांना देऊन मार्गदर्शक म्हणून दरवर्षी 30 लाख रुपयांपर्यंत कमाई करता येऊ शकते. तसेच 12 वी नंतर पक्षीशास्त्र, प्राणिशास्त्र आदी विषयातील अभ्यासक्रमासाठी शासन उत्तम शिष्यवृत्ती देते, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
शेवटी त्यांनी 1972 चा वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. या व्याख्यानाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, ज्युनिअर विभाग प्रमुख नीलेशकुमार यादव, शिक्षकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गंगावणे यांनी केले.