परीक्षाकाळात वेळेवर एसटी बसेस सोडा! - मनसेने आगारप्रमुखांना विचारला जाब

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 18, 2023 19:07 PM
views 157  views

सावंतवाडी : तालुक्यातील दहावी व बारावी शालांत परीक्षा जवळ आल्या असून एसटी बस वेळेत न लागल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संपूर्ण सावंतवाडी  तालुक्यात अशी परिस्थिती कायम असून आगारातून वेळेत एसटी बसेस सोडल्या जाव्यात, तर मळगाव - न्हावेली - मळेवाड - आरोस या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना एसटी बसची वाट पाहत बसावी लागते. त्यामुळे वेळेत एसटी बस फलाटावर लावण्याची व्यवस्था करावी,अशी मागणी विद्यार्थ्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगारप्रमुख नरेंद्र बोधे यांच्याकडे करण्यात आली.

 मागील काही दिवसापासून आरोस पंचक्रोशीतील एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडलेले आहे.  साडेअकराची एसटी सतत उशिरा फलाटावर लागत असून मागील काही दिवसापासून मुलांना एसटीसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. याप्रश्नी असंख्य विद्यार्थ्यांनी मनसेचे माजी शहराध्यक्ष आशिष सुभेदार व पदाधिकारी यांचे लक्ष वेधल्यानंतर शुक्रवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांसह सावंतवाडी एसटी आगारात धडक दिली. यावेळी आगार प्रमुख बोधे यांची भेट घेत त्यांना याचा जाब विचारण्यात आला.  विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासह पदाधिकारी यांनी आगारप्रमुख यांना धारेवर धरत पुढील मार्च महिन्यापासून दहावी, बारावी शालांत परीक्षा होणार आहेत. मात्र एसटी बस वेळेवर दाखल होत नाहीत अथवा सुटत नाहीत, अशी अवस्था आहे.

संपूर्ण तालुक्यात व विशेष करून आरोस पंचक्रोशी मार्गावर धावणाऱ्या गाड्याची समस्या विद्यार्थ्यांना अधिक भेडसावत असल्याची तक्रार केली. लवकरच परीक्षाना सुरुवात होणार आहे त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी घेऊन एसटी बसेस वेळेत सोडण्यात याव्यात, अशी मागणी केली. त्यावर आगारप्रमुख बोधे यांनी सध्या महाशिवरात्री उत्सवाच्या पार्शवभूमीवर गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विलंबाने काही गाड्या सुटत आहेत, अशी कबुली बोधे यांनी दिली. लवकरच गाड्याचे वेळापत्रक नियमित केले जाईल, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तात्काळ एसटी बसेस सोडण्यात येतील,  तसेच फलाटावर देखील लावून घेण्यात येतील असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शुक्रवारपासून वेळेवर एसटी बस  सुटेल असे आश्वासन दिले. तर दहावी व बारावीच्या परीक्षा इयत्ता सुरू होतील तर वेळेवर एसटी सुटावी कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आगर प्रमुखांना दिला.

 एसटी बस वेळेत सुटत नसल्याच्या प्रश्नावरून विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले. आरोस मळेवाड न्हावेली मार्गांवर मागील काही दिवस जाणारी एसटीबस नेहमीच तास दोन तास उशिरा लागते त्यामुळे विद्यार्थी उशिरा घरी पोहोचतात तसेच कंट्रोल केबिनमधून देखील नीट उत्तरे दिली जात नाहीत याकडे ही विद्यार्थ्यांनी यावेळी आगर प्रमुखांचे लक्ष वेधले. यापुढे असा कोणताही प्रकार घडल्यास कुठल्याही शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना अरेरवीची उत्तर दिल्यास मनसेही जशास तसे उत्तर देईल असां इशारा मनसे पदाधिकारी आशिष सुभेदार यांनी दिला. मनसे पदाधिकारी राजू कासकर यांनी तालुक्यातील इतर भागांमधूनही शिक्षणासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने सावंतवाडीत येतात त्यामुळे त्यासाठी जादा एसटी बसेसचीं व्यवस्था केली जावी. विद्यार्थ्यांसाठी एसटी नियमित वेळेतच सुटावी कोणाचीही तक्रार आल्यास यानंतर गय केली जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे, नंदू परब तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते