
सिंधुदुर्ग : शिक्षकांवर लादलेली अशैक्षणिक कामे नकोच, जुनी पेन्शन हवी, रिक्त झालेल्या शिक्षक पदांची तात्काळ भरती करा अशा एकूण ३२ प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक झाली आहे. मंगळवारी साजरा झालेल्या शिक्षक दिना दिवशीच राज्यभरातील शिक्षकानी सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होत आंदोलनाचा दुसरा टप्पा पूर्ण केला. आता एक ऑक्टोबर रोजी दिल्लीत अखिल भारतीय शिक्षकांचे आंदोलन व नागपूर अधिवेशनावेळी शिक्षकांचा भव्य मोर्चा हे आंदोलन करून शासनाला धारेवर धरू असा इशारा सिंधुदुर्ग सह राज्यभरातील या आंदोलनानंतर प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यस्तरीय नेते संघटनेचे सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आपल्या आंदोलनाबाबत व मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हासरचिटणीस सचिन मदने, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, कार्यालयीन चिटणीस संतोष कुडाळकर, आपा सावंत, कोणी मापसेकर, विजय सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी राजन कोरगावकर म्हणाले की, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जूनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारी निमसरकारी मध्यवर्ती समन्वय समितीच्या बेमुदत संपावेळी राज्यसरकारने जूनी पेन्शनबाबत आश्वस्त केले होते .परंतू त्यानंतर शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्हयात शिक्षकांची मोठ्याप्रमाणात असलेली रिक्त पदे यामध्ये एकट्या सिंधुदुर्ग जिल्हयात ११२७ पदे रिक्त असून १३० प्राथमिक शाळा शून्य शिक्षकी आहेत त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर अधिक ताण येत असून शिक्षक भरती करण्यास शासनाची उदासिनता याचा गुणवत्तेवर होणारा परिणाम, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त राबविण्यात येणारे उपक्रम,सातत्याने अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षकांना गुतवूण ठेवणे आणि शाळा , विद्यार्थी, शिक्षक यांचे महत्वाचे विविध प्रश्न प्रलंबित राहिल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून आज शिक्षक दिनादिवशीच सामुहीक रजा आंदोलन छेडले या धरणे आंदोलनाला शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती राजन कोरगावकर यांनी यावेळी दिली.