
सावंतवाडी : दडी मारलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केला असताना दुसरीकडे सावंतवाडी शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरात जवळपास 14 ठिकाणी जुनी व सध्या कार्यान्वित असलेली पाईप लाईन फुटल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून झालेल्या कामावेळी हे प्रकार झाले असून आता संबंधित कंपनीकडून 'हम आपके है कौन?' अशीच भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
एम. एन. जी. एल कंपनीकडून शहरात बहुतांश ठिकाणी काम करताना जुनी व कार्यान्वित असणारी पाईप लाईन फुटल्याचे प्रकार समोर आले होते. यावेळी त्यावर उपाययोजना देखील केली गेली. मात्र, खडीकरणानंतर काही भागात पाईप लाईन फुटल्याने आज मोठी समस्या निर्माण झाली आहे. यातच संबंधित कंपनीचे ठेकेदार आता नगरपरिषद प्रशासनाला जूमानत नसून ही काम करायची कोणी ? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, यात दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे स्वतः मुख्याधिकारी यांनी यात लक्ष घालणं आवश्यक आहे. मात्र, ओरोसह कुडाळ नगरपंचायतीचा कारभारही तेच हाकत असल्याने या परिस्थिती, समस्यांसमोर त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
दरम्यान, याबाबत नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाला विचारले असता, नगराध्यक्षां श्रद्धाराजे भोंसले यांनी संबंधीत कंपनींच्या ठेकेदारांना खडेबोल सुनावत तात्काळ दुरूस्तीचे आदेश दिले आहेत. आमच्याकडच मनुष्यबळ कमी असून शहरात सहा ठिकाणी मोठी समस्या आहे. त्यावर उपाययोजना करण्यात येत असून समस्या दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती संबंधीत विभागाकडून दिली गेली.











