
दोडामार्ग : गावचा विकास काय असतो हे दाखवून देणारे साटेली भेडशी गावचे धडाडीचे माजी सरपंच नामदेव फटी धर्णे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर गोवा येथे उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे साटेली भेडशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना हदय विकाराचा झटका आला होता. साटेली भेडशी गावातील क्रियाशील व्यक्तिमत्त्व तसेच एक प्रगतशील शेतकरी अशी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. सहा वर्षापूर्वी साटेली भेडशी गावचे सरपंच म्हणून नामदेव धर्णे यांनी गावात चांगले काम करून विकास काय असतो हे दाखवून दिले. सर्व राजकीय नेते मंडळी सोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
सामाजिक काम करत असताना त्यांनी काजू बागायती शेतीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. आपल्या मुलांना त्यांनी शेती व्यवसाय कडे वळविले. दिड महिन्यापूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. यात ते काहीसे कोमात गेले होते. त्यांनंतर बेळगाव व गोवा येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. गोवा येथे उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच साटेली भेडशी परिसरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, अनेक गावातील नागरीक, आजी माजी सरपंच यांसह ग्रामस्थ आदींनी त्यांच्या अत्यंदर्शन करिता गावात गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगे, मुली, तसेच सुना, नातवंडे, भाऊ, असा बराच मोठा परिवार आहे. धर्णे यांच्या निधनामुळे साटेली भेडशीसह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोडामार्ग तालुक्यात आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात त्यावेळी दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते लोकनेते सुरेश दळवी यांच्यासोबत केली. त्यांनंतर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ग्राम विकासासाठी काम केले. या अगोदर ते जनता दलाचे नेते कोकण रेल्वे शिल्पकार स्वर्गीय मधू दंडवते, जनता पक्षाचे माजी आमदार कै. जयानंद मठकर, तसेच सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर सोबत देखील नामदेव धर्णे यांनी काम केले. साटेली भेडशी गावातील ग्रामस्थ एकञ आले पाहिजे यासाठीही त्यांचा पुढाकार राहिला होता.साटेली भेडशी गावचा विकास झाला पाहिजे यासाठी ते तालुका ते जिल्हा ठिकाण मोटार सायकल घेऊन विकास कामांचे प्रस्ताव घेऊन धावपळ करत. दोडामार्ग तालुका शेतकरी काजू बागायतदार संघटना उपाध्यक्ष राकेश धर्णे यांचे ते वडील होते. त्यांच्या कामाची तळमळ दोडामार्ग तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माहिती होती. सदैव हसतमुख व मनमिळावू असल्याने त्यांचे सर्वांशीच सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने केवळ साटेली भेडशीच नव्हे तर दोडामार्ग तालुक्यातील एक प्रामाणिक व तळमळीने काम करणारा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
साटेली भेडशी सुतारवाडी येथे शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह आणताच शेकडोंच्या संख्येने नागरिक, ग्रामस्थ व महिलांनीही गर्दी केली होती. शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंतीम संस्कार करण्यात आले.