
मंडणगड : दहागांव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कुलचे माजी विद्यार्थी मंचाचेवतीने दहावी गुणवंत विद्यार्थी सन्मान 2025 व स्व. तानाजी अभंग आदर्श विद्यार्थी सन्मान असा संयुक्त कार्यक्रम नुकताच आयोजीत कऱण्यात आला होता. सुभाष दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर प्रशालेच्या विद्यार्थ्यानी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उत्तमकुमार जैन, ॲड. विनोद दळवी, ॲड. अभिजीत गांधी यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालांत परीक्षेतील गुणवंत प्रथम- वंशिका कांबळे, व्दितीय- सानिया चव्हाण, तिसरी- ईश्वरी तांबुटकर या विद्यार्थीनींचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. स्व. तानाजी अभंग आदर्श विद्यार्थी सन्मान या प्रथम पुरस्कारासाठी नुकत्याच शालांत परिक्षेत उत्तीर्ण झालेला, मंचाने दिलेले निकष पूर्ण करून निवड प्रक्रियेत पात्र ठरलेला श्रेयस जाधव (गाव- मुगीज) यास शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, रोख रुपये 5 हजार देवून मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2024-25 शालांत परिक्षेत महाराष्ट्र राज्यस्तरावर उत्तुंग यश मिळविलेला कौस्तुभ मोरे (दहागाव) याचा मंचातर्फे यथोचित सन्मानित करण्यात आला. यावेळी मंडणगड तालुका विकास मंडळ मुंबई या संस्थेचे सरचिटणीस ॲड. विनोद दळवी यांनी माजी विद्यार्थी मंचास शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे उत्तमकुमार जैन यांनी एलबीएसएच मंचाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या नियोजनबद्ध अशा स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून मंचाचे उपक्रमाचा भाग व्हायला मला नक्की आवडेल असे मत व्यक्त केले.
मंचाचे अध्यक्ष दिपक गोरीवले यांनी सर्व गुरुजनांचे आशीर्वाद आणि कौतुकामुळे आमचे मनोबल नक्कीच वाढलेले असल्याचे सांगत मंचातर्फे मान्यवरांना धन्यवाद दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाची सर्व कार्यकारीणी, सल्लागार, तसेच शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक सचिव महेंद्र सावंत यांनी तर सुत्रसंचालन आभार प्रदर्शन सुभाष दळवी यांनी केले.