‘मालवण’ युद्धनौकेचं जलावतरण..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 01, 2023 19:27 PM
views 1120  views

मालवण : यावर्षीच्या नौसेना दिनासाठी मालवण झाला झाले असताना दुसरीकडे कोचीन येथे 'मालवण' नावाच्या युद्धनौकेचे जलावतरण झाले आहे. 'आयएनएस मालवण' ही पाणबुडीविरोधी युद्धपतीची युद्धनौका आहे. मालवण हे नाव दिल्याने मालवणसह जिल्हावासियांसाठी हे अभिमानास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यावर्षीचा नौसेना दिन हा मालवण तालुक्यात होत आहे. तारकर्ली येथील समुद्र किनारी याचे भव्य शामियान उभारण्यात आले आहे. सध्या नौदलाच्या वतीने याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. समुद्र किनारी सध्या सरावं सुरु करण्यात आला आहे. जिल्हावासिय त्याठिकाणी गर्दी करत आहेत. एकूणच कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मालवण वासियांची मान उंचावणारी आणखी एक घटना घडली आहे.

नौसेना दिनाच्या आधीच कोचीन येथे  ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे जलावतरण झाले आहे. नौदलाने ‘आयएनएस मालवण’ अशी ओळख असणारी ही पाणबुडीविरोधी युद्धपद्धतीची युद्धनौका आपल्या ताफ्यात घेतली आहे.

नौदलाच्या ताफ्यात सध्या असलेल्या फ्रिगेट्स, विनाशिका या युद्धनौका पाणबुडीचा सामना करण्यास सक्षम आहेत. त्यासाठी पाणबुडीविरोधी पाणतीर डागण्याची त्यांची क्षमता आहे. मात्र, मोठ्या युद्धनौका या प्रकारचा लढा सहसा खोल समुद्रात देतात. किनाऱ्याजवळ किंवा प्रत्यक्ष खोल पाण्याआधी उथळ पाण्यात म्हणजे १२ सागरी मैल अंतरापर्यंत अशाप्रकारे पाणबुडीविरोधी लढा देण्यासाठी विशेष युद्धनौकांची नौदलाला गरज होती. त्यातीलच ‘मालवण’सह अन्य दोन युद्धनौकांचे गुरुवारी जलावतरण झाले.

या तीन युद्धनौकांची नावे ‘मालवण’, ‘मंगरोळ’ व ‘माहे’ अशी आहेत. मंगरोळ हे शहर गुजरातच्या किनारपट्टीवर, तर माहे हे केरळजवळील समुद्रकिनारी असलेले शहर आहे. तिन्ही युद्धनौकांची नावे समुद्रकिनारी असलेल्या शहरांच्या नावे देण्यात आली आहेत, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली.

नौदलामध्ये युद्धनौकांचे जलावतरण हे महिलांच्या हस्ते होते. त्यानुसार ‘मालवण’चे जलावतरण दक्षिण नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल सूरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते, ‘मंगरोळ’चे जलावतरण उपनौदल प्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय सिंह यांच्या पत्नी झरिन लॉर्ड सिंह यांच्या हस्ते व ‘माहे’चे जलावतरण भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल पुनीत बहल यांच्या पत्नी अंजली बहल यांच्या हस्ते झाले.