स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 17, 2025 19:48 PM
views 40  views

कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून याच निमित्ताने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आपण सुरु करीत आहोत. या शिबिराकडे आपल्याला आरसा म्हणून पाहता येणार आहे. कारण आपल्या आरोग्य व्यवस्थेत आपण कुठे कमी पडतो, हे या निमित्ताने पहायला मिळणार आहे. म्हणूनच या शिबिरात ज्या तपासण्या, उपचार, विविध बाबी होणार आहेत, त्याच्या नोंदी ठेवा, जेणेकरून आपण कुठे कमी पडतो, हे देखील समजेल, अशी सूचना पालकमंत्री नीतेश राणे यांनी केली. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाच्या शुभारंभप्रसंगी श्री. राणे बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, शासकीय वैद्यकीय महावि‌द्यालयाचे डीन अनंत डिंगणे, कणकवली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, डॉ. वि‌द्याधर तायशेटे, माजी सभापती सुरेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले, या शिबिराच्या निमित्ताने चांगला संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या विविध तपासण्या व उपचार केले जाणार आहेत. यासाठी मेहनत घेत असलेल्या सर्व डॉक्टर्सचेही मी मनापासून कौतुक करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या तीन निवडणुकांपासून देशाचे नेतृत्व करत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाची सेवा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण हे शिबिर राबवत आहोत. म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रामध्ये आतापर्यंत देत आलोत त्याहीपेक्षा जास्त सेवा महिला रुग्णांना या शिबिराच्या माध्यमातून देण्याचे काम होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

नरेंद्र मोदी उत्कृष्ट प्रशासक, आदर्श पंतप्रधान आहेत. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबवावा. सिंधुदुर्गात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. साहजिकच त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरविल्यास जिल्ह्याचा विकास आणखीन सुखकर होईल. या उपक्रमाला रोटरी क्लबनेही हातभार लावला. डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यासारखी समाजपरिवर्तन करणारी मंडळी आपल्यासोबत आहेत, ही समाधानाची बाब आहे. हे शिबिर पंधरा दिवस चालणार असल्याने आणखीन १४ दिवस आपल्या हातात आहेत. या दिवसांचे योग्य नियोजन करा. आज शुभारंभाची फित कापल्यानंतर उद्यापासून तक्रारीचा पाऊस पडणार नाही, याची दक्षता घ्या. शासकाकडून जे जे कार्यक्रम आले आहेत, ते पुढील १५ दिवस चोखपणे राबवा, अशी सूचनाही राणे यांनी केली.

डॉ. श्रीपाद पाटील म्हणाले, स्वस्थ नारी सशक्त महिला अभियान १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. शिबिरात कॅन्सर, मधुमेह, मानसीक रोग अशा विविध रोगांबाबत तपासणी व उपचार होणार आहेत. विविध आजारांबाबत जनजागृती करतानाच अवयवदानाची प्रतिज्ञाही घेण्यात आली आहे. यानिमित्ताने रक्तदान शिबिरही पार पडले आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयात हे शिबिर होणार आहे. सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.

...तर मी आकस्मिकपणे येईन

आपल्याकडे पदे आहेत, ती लोकसेवेसाठी आहेत, याची सर्वांनीच जाणिव ठेवा. सर्वांनी एकत्रितपणे चांगले काम करूया. या पंधरवड्यात महिलांना कशी सेवा मिळत आहे, हे पाहण्यासाठी मी मध्येच आकस्मिकपणे येईन. मी कुठेही, कधीही जातो, हे तुम्हाला माहितच आहे, अशी मिश्किल टिपणीही राणे यांनी यावेळी केली.