'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' योजनेचा वैभववाडीत शुभारंभ

अ.रा.विद्यालयात विद्यार्थीनींना मोफत एस.टी.पास चे वितरण
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 12, 2024 15:51 PM
views 107  views

वैभववाडी : एसटी महामंडळाच्या " एसटी पास थेट शाळेत"या धोरणाचा शुभारंभ आज वैभववाडीत झाला.येथील वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी थेट एसटी पास शाळेत वितरण करण्यात आले.या नविन धोरणामुळे विद्यार्थीनींनी आता एसटी   पासाकरिता बसस्थानकात रांगेत उभे राहावे लागणार नाही.

राज्य सरकार मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवित असते.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत  शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जातात. विद्यार्थींना बारावी पर्यंत मोफत एसटी पास मिळत असतो. या विद्यार्थ्यांना आता एसटीने थेट शाळेत पास वितरीत करण्याच धोरण शासनाने आखले आहे.शाळा- महाविद्यालयात  शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे लाल परीने प्रवास करणाऱ्या  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थीनींना मोठा दिलासा मिळत आहे. ” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” ही विशेष मोहीम सध्या महाराष्ट्रात सर्वत्र राबबली जात आहे.येथील  अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी येथे प्रशालेत शिक्षण घेणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील एस.टी.ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थीनींना 'एस टी.पास थेट तुमच्या शाळेत' या योजने अंतर्गत आज एस टी.पास चे वितरण करण्यात आले. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, वैभववाडी वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, लिपिक पी.पी.कोकरे प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व लाभार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.