
सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षण सप्ताहचा उत्साहात शुभारंभ झाला. 22 जुलै ते 28 जुलै कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमांचा आजचा पहिला दिवस असून यामध्ये 5 वी ते 12 वी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
अध्ययन-अध्यापन शैक्षणिक साहित्य निर्मिती, वाचन कट्टा, कथा कथन अशा वैविध्य पूर्ण उपक्रमांनी हा दिवस साजरा झाला. प्रत्येक वर्गासाठी विषय देण्यात आले. वर्गवार गट करण्यात आले. गटानुसार साहित्य निर्मिती झाली. विद्यार्थ्यांनी स्वनिर्मितीचा आनंद घेतला. वाचन कट्टा अंतर्गत विविध लेखकांची पुस्तके वाचून काही निवडक पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी ओघवत्या शैलीत पुस्तक परीक्षण केले. या निमित्ताने अनेक लेखकांच्या साहित्याचा परिचय झाला.
कथाकथन कार्यक्रमातून अनेक सुंदर सुंदर बोधकथांचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक वर्गामधून दोन विद्यार्थ्यांना कथाकथनाची संधी देण्यात आली होती. आजच्या या उपक्रमाला केंद्र सावंतवाडी-1 चे केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.एकंदरीत हा शिक्षण सप्ताह मधला पहिला दिवस उत्साहात साजरा झाला. प्रशालेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग दर्शविला.