
देवगड : देवगड तालुक्याची अर्थक्रांती महत्त्वाचा बदलणारा आनंदवाडी बंदरजेटी प्रकल्प मंजूर झाला आणि अनेकांच्या आशा पल्लवितदेखील झाल्या. मात्र, सद्यस्थितीत आनंदवाडी प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. येथील किनारपट्टी भागातील लोकांचा मच्छीमारी प्रमुख व्यवसाय असून, या प्रकल्पामुळे देवगड शहराच्या विकासाला तसेच येथील उद्योग व्यवसायांना चालना मिळाली असती. त्यामुळे हा बंदरजेटी प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. मात्र तसे होत नाही. पर्यटन जिल्ह्याचा विचार करता आपण लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जिल्हा महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन काँग्रेस सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष उल्हास मणचेकर यांनी केली आहे.
देवगड आनंदवाडी प्रकल्प गेली सात-आठ वर्षे चालू आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपये वर्षानुवर्षे खर्च होताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात जागेवर काहीही काम दिसत नाही. केवळ शासनाच्या पैशाचा अतिरिक्त खर्चच दिसत आहे. स्थानिक मच्छीमारांची समस्या वर्षानुवर्षे तशाच असून दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. सुरुवातीला भरावाचे काम मोठ्या प्रमाणात चालू होते. ती ठेकेदार कंपनी सोडून गेली. आता गेल्या दोन वर्षात नवीन एजन्सी नेमून खर्च झाला. पण काम हवे त्या पद्धतीने चालू दिसत नाही.
कोणत्याही पद्धतीची आधुनिक सामग्री, मनुष्यबळ सदर एजन्सीकडे दिसत नाही. त्यामुळे कामावर कोणताही परिणाम दिसत नाही. याकडे तातडीने लक्ष घालून या कामात सुधारणा दिसावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना देण्यात आला आहे.