स्व. गोविंदरावजी निकम जयंती महोत्सव १६–१७ जानेवारीला

यजुर्वेद महाजन - गार्गी फुले थत्ते यांची प्रेरणादायी उपस्थिती
Edited by:
Published on: January 13, 2026 13:29 PM
views 25  views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक, माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त दिनांक १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी सावर्डे येथील स्मृतिगंध या स्मारकस्थळी भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचा शुभारंभ १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार असून, यावेळी दीपस्तंभ फाउंडेशन, जळगावचे संस्थापक अध्यक्ष यजुर्वेद महाजन तसेच चित्रपट व नाट्य अभिनेत्री गार्गी फुले थत्ते युवा पिढीला मार्गदर्शन करणार आहेत.

दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचे संस्थापक असलेले यजुर्वेद महाजन हे शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय वक्ता म्हणून परिचित आहेत. विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वाचनसंस्कृती रुजवणे, स्पर्धा परीक्षांसाठी युवकांचा आत्मविश्वास वाढवणे आणि ‘अभ्यास मित्र–करिअर मित्र–पालक मित्र’ या भूमिकेतून मार्गदर्शन करणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.

तर मराठी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शन मालिकांतील प्रभावी भूमिका व दिग्दर्शन क्षेत्रातील योगदानामुळे ओळखल्या जाणाऱ्या गार्गी फुले थत्ते यांच्या प्रेरणादायी विचारांची मेजवानी यानिमित्ताने युवा पिढीला मिळणार आहे. जयंती महोत्सव सोहळ्याची सुरुवात 16 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता भक्तीसंगम सह्याद्री कलामंच प्रस्तुत गीतांजली या कार्यक्रमाने होणार आहे दुपारी तीन वाजता फक्त बसा आणि मनसोक्त हसा हा विशेष कार्यक्रम लोकशाहीर रणजीत आशा अंबाजी कोल्हापूर सादर करणार आहेत संध्याकाळी सात वाजता भजन संध्या सह्याद्री परिवार कर्मचारी वृंद यांच्यावतीने सादर केला जाणार आहे 17 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण होईल या बक्षीस वितरण समारंभाला मराठी अभिनेते व हास्य जत्रा फिल्म प्रभाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे याच दिवशी सकाळी 11 वाजता सह्याद्री बालकलाविष्कार व दुपारी दोन वाजता सह्याद्री युवा कलाविष्कार सादर केला जाणार आहे

या सोहळ्याला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, विश्वस्त मंडळातील सर्व सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. 

जयंती महोत्सवात स्व. गोविंदरावजी निकम साहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रहिताच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असून, विविध उपक्रम व मार्गदर्शन सत्रांद्वारे त्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.  या ९१ व्या जयंती महोत्सवात नागरिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे सचिव महेशजी महाडिक व महोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.