
सावंतवाडी : जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सध्या परप्रांतीय धनदांडग्यांकडून जमिनी लाटण्याचे सत्र सुरू असतानाच, कोलझर गावाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला आहे. गावातील मुख्य देवस्थानासमोर एकत्र येत संपूर्ण गावाने आम्ही आमची एक इंचही जमीन कोणालाही विकणार नाही अशी शपथ घेतली आहे. या निर्णयामुळे जमीन दलाल आणि दिल्लीतील धनदांडग्यांच्या गोरखधंद्याला मोठे आवाहन मिळाले असून, बेसुमार वृक्षतोड थांबणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत स्थानिक दलालांच्या मदतीने शंभर-दीडशे एकर जमिनी दिल्लीतील बड्या हस्तींच्या घशात घालण्याचे प्रकार वाढले आहेत. या व्यवहारांमुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातील पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. कोलझरमधील युवकांनी एकत्र येत दाखवलेली ही एकजुट या जमिनी लाटण्याच्या षडयंत्राला खीळ बसवणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाने संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोड बंदी लागू केली आहे, असे असतानाही सरमळे, कळणे, फुकेरी आणि कोलझर यांसारख्या गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. या राक्षसी वृक्षतोडीमुळे निसर्गाचे अपरिमित नुकसान होत असून, प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष चिंतेची बाब ठरत आहे.
जयेंद्र परुळेकर यांनी या मोहिमेचे स्वागत करताना म्हटले आहे की, कोलझरमध्ये जे घडले ते केवळ एका गावापुरते मर्यादित राहू नये. सह्याद्री पट्ट्यातील आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावात अशा प्रकारची शपथ घेतली जाणे काळाची गरज आहे. गावागावातील देवदेवतांसमोर अशी एकजुट झाल्यास परप्रांतीयांची जमीन खरेदी आणि पर्यायाने होणारी वृक्षतोड थांबवता येईल असं मत व्यक्त केले.










